कविता - एका वाल्मिकीची रामकथा


कविता - एका वाल्मिकीची रामकथा

रानाच्या शांत कुशीत
क्रौंचांची जोडी
प्रेमात हरवली होती;
एका बाणाने क्षणात
सारं रान निःशब्द झालं...

त्या आक्रंदनाने
रत्नाकराच्या अंतरात
दडलेली माणुसकी जागी झाली;
हातातील हिंसा थांबली,
डोळ्यांत परदुःखाची ओल उतरली.

मनानं त्याला विचारलं—
दुसऱ्याचं जीवन लुटताना
आपण हरवतोय तरी काय?

त्या प्रश्नानं अंतर ढवळलं;
जुना रत्नाकर मागे पडला.
तपश्चर्येच्या दीर्घ वाटेवर
अहंकार विरघळत गेला,
मनात करुणा रुजत गेली
आणि जन्माला आला
वाल्मिकी—करुणेचा कवी.

त्याच्या लेखणीत
राम मुकुटात दिसला नाही;
पित्याचं वचन जपणाऱ्या
निःशब्द पावलांत दिसला.

सीतेच्या अश्रूंमध्ये
त्याने न बोललेली वेदना ऐकली;
लक्ष्मणाच्या सावलीत नातं,
भरताच्या त्यागात प्रेम पाहिलं;
रामात माणूस शोधला.

म्हणून राम लिहिताना
त्याने करुणेला शब्द दिले;
लव-कुशांच्या कंठातून
ती कथा पिढ्यांच्या ओठांवर आली.

आजही दुःख पाहताना
आपले डोळे ओलावतात;
अन्यायासमोर आपण उभे राहतो—
तेव्हा कुठेतरी आत
वाल्मिकींची लेखणी हलते.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०२/०९/२०२६ वेळ : ०२:२५

Post a Comment

Previous Post Next Post