सौ. स्नेहल गणेश जगदाळे यांचा ‘माझी बाबी’ हा लेख येथे सादर करीत असून, त्या लेखाविषयी माझा अभिप्राय खाली नोंदवत आहे.
🙏🙏🙏🙏
२१ फेब्रुवारी २०२६
*माझी बाबी*
रस्ता मोकळा असूनही अदबीनं ओलांडताना पाहून माझा अल्लड मित्र अनावधानाने बोलून गेला- "नऊवारी लुगड्याचा साज आणि डोईवरला पदर खांद्यावरही येऊ न देणारी ही शेवटची पिढी असेल हं !.." या वाक्यातली व्याप्ती काही कळली नाही पण तरिही टचकन् आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात हे जाणवलं आणि पुढे चालत असलेल्या त्या पाठमोर्या आकृतीकडे पाहताच मन अश्या काही विचारात पडले की, अंधुक दिसणारी ती आकृती आता दिसेनाशी झालीय हे कळण्यासाठी त्याच मित्राने भानावर आणलं आणि न कळलेलं ते वाक्य अगदी एखाद्या कोड्याचं उत्तर ध्यानीमनी नसताना सापडावं तसं उलगडलं.
खरंच, प्रत्येकाचंच आयुष्य खाचखळग्यांनी भरलेलं असतं पण, स्वतःचंच दुःख कुरवाळण्याची सवय झालेल्यांना इतरांच्या पाण्याच्या थेंबाएवढ्या जगण्यातील डोंगराएवढं दुःख जाणून घ्यायची साधी तसदीही घेऊ वाटत नाही.
खूप जवळून पाहिलंय, 'असलेल्या गरिबीची लाज वाटते म्हणून नसलेल्या श्रीमंतीचा माज दाखविणारे हरहुन्नरी बादशाह आणि, आज एकवेळच्या जेवणाचा बंदोबस्त होईल की नाही याची शाश्वती नसतानाही कुठल्याही तक्रारीविना जगण्यात समाधानाचे रंग भरणारे आयुष्याचे खरे चित्रकार !..'
आज मी उलगडणारं व्यक्तिमत्त्वही त्यातलंच एक, त्या दुसर्या प्रकारातलं !..
फार फार कष्टांच्या काटेरी आयुष्यात जगतानाही त्या कष्टांचे ते घाव झेलताना तिच्या चेहऱ्यावर नेहमी निरागस हास्य फुलायचं, मोठ्ठ्याश्या कपाळावरचं ठसठशीत कुंकू तिच्या समाधानाचं गुपित सांगायचं, मूलबाळ नसलं तरी सोन्यासारख्या साथीदारासोबत तिचा रोजचा दिवस कालपेक्षा उत्तमच असायचा. कालांतराने त्या ठसठशीत कुंकवाने भरलेलं तिचं कपाळ एखादं माळरान ओसाड पडावं तसं दिसू लागलं तसा तिचा चेहरामोहराच बदलून गेला, सर्वार्थाने !
कष्टाची चटणी भाकर खातानाही जिला त्या चटणी- भाकरीतच पुरणपोळीचं सुख गवसायचं त्या बाबीला आता चतकोर भाकरीही जड होत होती. नथ नसली तरी लालजरीत कुंकवाने आपलं सौंदर्य सजवायचं कसब जिच्याकडे होतं तिचा चेहरा आता सुरकूत्या नसतानाही क्षीण दिसत होता. रोजचा रवी येताना तिच्यासाठी नवा संघर्ष न चुकता घेऊन यायचा आणि तरीही जगण्यातली तिची उमेद कालपेक्षा आज काही वेगळी नव्हतीच.
हो, ती खचली होती, संघर्षाला नाही तिच्या एकटेपणाला आणि तरीही तक्रार मात्र कधीच नव्हती, मुळात तिचा तो स्वभावच नव्हता, सहानभूतीची खपली आणि पोकळ आश्वासनांची फुंकर यांची तिला कधीच अपेक्षा नव्हती, इतरांनी तिच्या एकटेपणाची कीव आणि गरिबीच जाणीव करावी, हे तिला मुळी मान्यच नव्हतं.
'तुमच्यासारखाच माझाही जन्म आणि तुमच्यासारखंच माझंही जगणं, बाकी उरलं ज्याचं त्याचं प्रारब्ध.' एवढं सरळ आणि सहज तिच्या समाधानाचं सार होतं.
तिचं जगणं रोज नवी प्रश्नपत्रिका घेऊन तिच्यापुढे उभं राहायचं आणि तिची उत्तरपत्रिका सार्या सार्या प्रश्नांची उत्तरं लिहून नव्या प्रश्नपत्रिकेसाठी जणू सज्ज असायची, ठिगळं लावलेली तिची वहाणं तिच्या भावनांचंही ओझं वहायची, तिच्या जन्मानं तिच्या पुढ्यात दुःखाचा डोंगर ठेवला असतानाही त्याच दुःखाच्या डोंगरांतून सुखाचा झरा फुटेल अशी आशावादी असायची ती आणि उधारीचं अवसान घ्यायलाही कचरणारी माझी बाबी स्वाभिमानानं नवा दिवस जगायची.
पुनर्जन्मावर तिचा विश्वास होता की नाही, माहीत नाही; पण आज नक्कीच तिच्या कवेत आभाळभर आनंद आणि विस्तीर्ण सुखाची व्याप्ती असेल, तिच्या स्वभावानेच तिचं सौंदर्य आजही पौर्णिमेच्या रात्रीसारखं उजळत असेल.
कोण्या एके दिवशी कुठल्याश्या ठिकाणी आमचीही पुन्हा एकदा भेट होईल आणि तेव्हा तिलाच सांगेल, तिच्या असण्याचं अस्तित्व, तिच्या ममतेचं पूर्णत्व आणि तिचं निरपेक्ष, अथांग मातृत्व तिला आजही सार्यांहून कसं निराळं ठरवतं ते, जणु रोहिणी नक्षत्रंच!..
सौ. स्नेहल गणेश जगदाळे
🙏🙏🙏🙏
अभिप्राय: 'माझी बाबी'
सौ. स्नेहल गणेश जगदाळे यांच्या ‘माझी बाबी’ या लेखात मानवी जीवनातील संघर्ष, स्वाभिमान, कृतज्ञता आणि मातृत्वाचा उदात्त भाव अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी शब्दकळेतून उलगडत जातो. रस्त्यावर दिसलेल्या एका साध्याशा दृश्यातून सुरू झालेला हा लेख हळूहळू एका व्यापक जीवनदर्शनाकडे वळतो. लेखिकेची निरीक्षणशक्ती, सूक्ष्म भाव टिपण्याची क्षमता आणि त्यांना प्रभावी शब्दरूप देण्याची हातोटी या लेखाला विशेष उंची प्राप्त करून देते. प्रारंभीचे निवेदनच वाचकाच्या मनात कुतूहल जागवते आणि पुढील लेखनासाठी मानसिक तयारी घडवून आणते.
लेखातील ‘बाबी’ हे व्यक्तिमत्त्व केवळ एका स्त्रीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ती संपूर्ण श्रमिक वर्गाच्या संघर्षशील, संयमी आणि स्वाभिमानी जगण्याची साक्ष बनते. गरिबी, कष्ट, एकटेपणा आणि जीवनातील कठोर वास्तव असूनही तिच्या वृत्तीत असलेले समाधान, कृतज्ञता आणि सकारात्मक दृष्टी जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच आदर्श घालून देतात. लेखिकेने बाबीच्या आयुष्यातील वेदना करुणेने रंगवताना त्यामध्ये दयेचा अतिरेक न करता तिच्या आत्मसन्मानाचे तेजोवलय अबाधित ठेवले आहे, ही बाब लेखनातील परिपक्वतेचे द्योतक ठरते.
भाषिक दृष्टीने हा लेख अत्यंत समृद्ध आहे. रूपके, उपमा, प्रतिमा आणि सूचक विधानांचा अत्यंत परिणामकारक वापर झालेला दिसतो. ‘कष्टाची चटणी-भाकर खातानाही पुरणपोळीचे सुख गवसणे’ किंवा ‘ठसठशीत कुंकवाने भरलेले कपाळ माळरानासारखे ओसाड पडणे’ अशा प्रतिमा केवळ दृश्य उभे करत नाहीत, तर वाचकाच्या अंतर्मनाला थेट भिडतात. भाषा सहज, प्रवाही, भावनाप्रधान असूनही कुठेही अतिरंजित वाटत नाही. त्यामुळे लेखाचा भावनिक प्रभाव अधिक गडद आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरतो.
लेखाचा आशय मानवी मूल्यांची पुनर्स्थापना करणारा आहे. स्वाभिमान, संयम, सहनशीलता आणि आत्मिक समाधान यांसारख्या गुणांचे महत्त्व अधोरेखित करताना लेखिका आधुनिक भौतिकवादी मानसिकतेवर सूचक भाष्य करते. बाबीचे जीवन हे संघर्षाचे असले तरी ते निराशेचे नाही, तर आशेच्या प्रकाशाने उजळलेले आहे. तिच्या जगण्यातून वाचकाला स्वतःच्या आयुष्याकडे अधिक संवेदनशील आणि कृतज्ञ दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. ही प्रेरणाच या लेखाचे खरे साहित्यिक यश ठरते.
एकूणच ‘माझी बाबी’ हा लेख भावनाशीलता, विचारगर्भता आणि भाषिक सौंदर्य यांचा अत्यंत सुरेल संगम साधणारा, वाचकाच्या अंतर्मनाला भिडणारा आणि मनावर खोल ठसा उमटवणारा ठरतो. लेखिकेची नेमकी शब्दनिवड, आशयाची सुसूत्र आणि प्रवाही मांडणी तसेच भावनिक समतोल यांमुळे हा लेख केवळ वाचनानुभव न राहता तो एक समृद्ध संवेदनात्मक अनुभव बनतो. सामाजिक वास्तवाचे सूक्ष्म आणि प्रामाणिक दर्शन घडवत मानवी मूल्यांची जपणूक करणारा हा लेख मराठी साहित्यातील एक दर्जेदार, अर्थपूर्ण आणि स्मरणात राहणारी साहित्यकृती म्हणून निश्चितच गौरवास्पद ठरते.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/०२/२०२६ वेळ : ०४:०५
Post a Comment