कविता – वरदान


कविता – वरदान
 
किंमत असते ती वस्तूंची...
वरदानांना कधीच मोल नसतं.
 
पहिल्या रडण्यात 
ज्याने जीवनाला 
पहिली लय दिली, 
त्या हवेने 
कधी हिशेब मागितला नाही.
 
तहानलेल्या ओठांवर 
पाण्याने नेहमीच 
जगण्याचा ऋतू उतरवला... 
आणि
आपण त्याला
फक्त पाणी
म्हणत राहिलो.
 
झोप 
दररोज थकलेल्या दिवसाचे ओझे 
अलगद उतरवते... 
आणि डोळ्यांत 
उद्याचा एक किरण सोडून जाते.
 
शांती... 
ती बाहेर सापडत नाही; 
ती मनातले वादळ निवळल्यावर उमलते.
 
आणि हे श्वास...

प्रत्येक श्वास सांगतो— 
जगणं मिळकत नसतं, 
ते सृष्टीने विश्वासाने 
आपल्या ओंजळीत ठेवलेलं 
वरदान असतं.
 
म्हणून जे मोफत मिळतं, 
ते कधीच स्वस्त नसतं.
 
त्याची किंमत तेव्हा कळते...
जेव्हा
सगळं काही असतं...
पण
जगण्यासाठी
एकही श्वास
शिल्लक राहत नाही.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक: ०२/०८/२०२६ वेळ: ०६:०३

Post a Comment

Previous Post Next Post