कविता - तुझ्याविना मी


कविता - तुझ्याविना मी


तुला जाणून घ्यायचं आहे ना,
तुझ्याविना मी कसा आहे?

हिमालयाच्या कुशीत शिव नसेल,
तर कैलास उरेल का?
शब्दांतून मात्रा हरवल्या,
तर अर्थ उमलेल का?

आरती असेल,
पण दीप नसेल,
तर भक्ती उजळेल का?

पार्वतीविना उभा शिव
जसा शांत कैलास,
तसाच तुझ्याविना मी—
अर्धवट राहिलेला श्वास.

डोळे आहेत,
पण प्रकाश हरवलाय;
देह आहे,
पण जगण्याचा अर्थ हरवलाय.

आभाळ आहे,
पण चांदणं हरवलंय;
ओंजळ आहे,
पण त्यातलं पाणी सांडून गेलंय.

तू नाहीस म्हणून
हृदय धडधडतंय,
पण प्रत्येक ठोक्यात
एक रिकामेपण वाजतंय.

तुझी आठवण आली की
मनाच्या उंबरठ्यावर
एखादा जुना दीप
नकळत पुन्हा उजळतो.

तू दूर असतानाही
श्वासांच्या वाटेवर
तुझीच चाहूल असते;
प्रत्येक धडधडीत
तुझाच स्पर्श असतो.

म्हणून विचारू नकोस—
“तुझ्याविना मी कसा आहे?”

तूच माझ्या जगण्याचा अर्थ,
तूच श्वासांची ओळख;
तू नसशील तर
मी उरेन कदाचित—
पण माझ्यातला ‘मी’
कुठे उरेल?

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १८/०८/२०२६ वेळ: ०४:५०

Post a Comment

Previous Post Next Post