कविता – रंगमंचावर उमललेली स्वप्ने
रंगमंचाच्या कुशीत
*१२८* स्वप्ने उमलली,
कित्येक मनांची स्पंदने
शब्दांतून बोलू लागली.
*रा + धा बरोबर* च्या सुरांत नाती फुलली,
*व्हेअर देअर इज अ विल* म्हणत वाट उजळली;
*शागीर्द* कलेची वाट चालला,
*रंगलेल्या गालाचा मुका* प्रेमाची आठवण झाला.
*द फीलिंग पॅराडॉक्स* मनात उमटला,
*पाचवा स्तंभ* प्रश्नांचा आरसा झाला;
भक्तीच्या वाटेवर *ईठ्ठला* भेटला,
*आयाम* बदलले, *रेनबोवाला* रंग भरला.
स्वप्नांचा *ब्लॉसम* हळुवार फुलला,
*संगीत अतृप्ता* त अपुरा स्वर दाटला;
*संगीत सूरसाधक* ने स्वर जुळवले,
*निब्बाण* च्या शांततेत मन विसावले.
*अन्वेषण* नव्या क्षितिजाकडे निघाले,
*फक्त एकदा वळून बघ* म्हणत स्मरण जागले;
इतिहासातून *धि हिंदू लेडी* ची चाहूल आली,
*कोपऱ्याच्या शोधातील वर्तुळ* उत्तर शोधत राहिले.
*खेळिया* ने जीवनाचा डाव मांडला,
*परी कीर्तीरूपे उरावे* हा ध्यास जागा झाला;
*मी मृत्युंजय कोलंबस* क्षितिजापलीकडे गेला,
स्वप्नांचा नवा किनारा शोधत राहिला.
*घननिळा* मेघ दाटला, तरी दीप विझला नाही,
*स्वराज्याचं तोरण* उंचावलं, आशा हरली नाही;
*ती आणि ते तिघे* नात्यांत माणूसपण शोधत राहिले,
*पळपुटा* ही स्वतःकडे परतण्यास आसुसला.
मनावरचा *दंश* काळजाच्या तळाशी राहिला,
*उतरण* आली, तरी *मळभ* कायमचे ठरले नाही;
*ही परी अस्मानीची* आशेची चाहूल घेऊन आली,
*नोंद नसलेलं प्रकरण* मनांनी जपून ठेवले.
*लेखिका* च्या शब्दांनी निःशब्दांना आवाज मिळाला,
*तीस* नाट्यस्वप्नांतून एक रंगविश्व उजळले;
काही हातांत पारितोषिके विसावली,
काही नावांवर टाळ्यांचा वर्षाव झाला;
तरी प्रत्येक लेखणीने रंगभूमीला मन दिले.
पडदा पडेल,
टाळ्यांचा नाद कधीतरी विरून जाईल;
पण कथांचा उजेड
मनांच्या रंगमंचावर तेवत राहील.
नाटक संपेल,
शब्द मात्र पिढ्यांच्या ओठांवर फुलतील;
मराठी रंगभूमीच्या आकाशात
नवी स्वप्ने उजळतील.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १६/०८/२०२६ वेळ: ११:१६
Post a Comment