कविता – अंतर्मनाची गंगा
चांदण्यांना न्याहाळताना
मनात शिवनाम जागे;
गंगेच्या पवित्र तीरावर
दुःख सारे वाहून जावे.
आयुष्याने दिलेले घाव
मनात खोल रुजले;
आपले म्हणवणारेही
कधी परके झाले.
तुटलो, विखुरलो तरी
श्वास मात्र सुरू होता;
हसऱ्या चेहऱ्यामागे
डोळे मात्र रडत होते.
म्हणतात, गंगेत न्हाल्यावर
पाप सारे धुऊन जाते;
पण आज उमगले—
मनही इथे स्वच्छ होते.
गंगेच्या काठावर बसून
लाटांशी बोलताना,
मनावरचे ओझे हलके झाले
शिवनाम घेताना.
नीलकंठासारखे शिव
विषही अंतरी पचवतात;
गंगेच्या निर्मळ लाटा
दुःख अलगद वाहून नेतात.
जे गेले, ते जाऊ दे;
हातात काय उरले आहे?
कालच्या अश्रूंपेक्षा
आजचे हसू सुंदर आहे.
गंगेच्या निर्मळ धारेत
स्वतःलाच शोधताना,
हरवलेले मन पुन्हा
स्वतःला सावरू लागले.
गंगेच्या काठी बसून
एक सत्य उमगले—
गंगा बाहेर वाहत होती,
मन मात्र आतून वाहिले.
दुःख आले, थांबले नाही;
आयुष्यही थांबले नाही.
गंगेने एवढेच शिकवले—
वाहत राहा...
स्वतःला हरवू नका;
मनातला प्रकाश
कधी विझू देऊ नका.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १४/०८/२०२६ वेळ:११:४३
Post a Comment