कविता – जिवंतपणी माणूस जपा


कविता – जिवंतपणी माणूस जपा

जिवंत असताना
ज्याच्या डोळ्यांत
तुम्ही अश्रू पेरले,
त्याच्या मरणावर
अश्रूंचे पारिजातक
कशाला?

ज्याच्या शब्दांना
तुम्ही मौन दिले,
ज्याच्या मनाला
तुम्ही घाव दिले,
त्याच्या आठवणींवर
फुलांचा वर्षाव कशाला?

श्वास घेताना
ज्याला आपलेपणा दिला नाही,
त्याच्या निष्प्राण देहाला
खांदा देऊन
माणुसकीचा मुखवटा
कशाला?

जिवंत माणूस
प्रेमासाठी आसुसलेला असतो;
मृत माणसाला
प्रेमाची गरज नसते;
गरज असते ती
जिवंतपणी मिळालेल्या
एका मायेच्या स्पर्शाची!

मृत्यूनंतरचे अश्रू
कितीही खरे वाटले,
तरी त्यांना
पश्चात्तापाचा वास असतो;
कारण गेलेला जीव
ते अश्रू पुसायला
परत येत नसतो.

म्हणूनच—
त्याच्या मनातला
दिवा जपून ठेवा;
ओठांवर हसू ठेवा,
हातातला हात
सुटू देऊ नका.

कारण
मृत्यूनंतरची श्रद्धांजली
कितीही मोठी असली,
तरी जिवंतपणी दिलेला
प्रेमाचा एकच शब्द
तिच्याहून मोठा असतो.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक: १०/०८/२०२६ वेळ: ०९:३६

Post a Comment

Previous Post Next Post