तुझा बाबा आहे ना...
जर तू माझ्या आयुष्यात आलीस,
तर मी तुला
राजकुमारी म्हणणार नाही.
मी हाक मारेन—
"पिल्ला..."
या एकाच हाकेत
माझी माया असेल,
माझा श्वास असेल,
आणि आयुष्यभर पुरेल
एवढा विश्वासही.
तू पहिलं पाऊल टाकशील,
तेव्हा माझे हात
तिथेच असतील;
पण तुझ्या पावलांना
दिशा देणारं बळ
तुलाच शोधायचं असेल.
तुला उंच झेप घ्यायची असेल,
तर क्षितिजापलीकडे जा.
वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना
तुझ्या प्रवासाच्या
पहिल्या पायऱ्या समज.
कोणी म्हणेल—
"मुलींनी हे करू नये..."
तू फक्त हस.
कारण स्वप्नांना पंख देणाऱ्या मनाला
कुठल्याही चौकटीची
गरज नसते.
तुला पाहिजे ते
बिनधास्त कर.
फक्त मनातला विश्वास
कधीच गमावू नकोस;
तोच अंधारलेल्या वाटेवरही
तुझा दीप बनेल.
चुकलीस तरी घाबरू नकोस,
कारण पडणं म्हणजे हरणं नसतं;
ते पुन्हा उभं राहायचं
नवं बळ देतं.
यश आलं,
तर माझ्या डोळ्यांत
अभिमानाची चमक असेल.
अपयश आलं,
तर माझा अढळ विश्वास
तुझ्या पाठीशी
खंबीरपणे उभा असेल.
जग तुला
रूपात मोजेल,
चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करेल;
पण मी पाहीन—
तुझ्या डोळ्यांतील स्वप्न,
तुझ्या पावलांतील धैर्य
आणि तुझी जिद्द.
माझी एकच इच्छा—
तू कुणाच्या सावलीत
उभी राहू नकोस.
स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवून
असं आभाळ निर्माण कर,
की तुला पाहून
इतर मुलीच्या मनातही
स्वतःची झेप घेण्याचं
धैर्य जागं व्हावं.
आणि जेव्हा जग तुला विचारेल—
"तुझ्या धैर्याचं रहस्य काय?"
तेव्हा हसत एवढंच सांग—
"लहानपणी
बाबांनी
मनात एक वाक्य
कायमचं कोरलं होतं...
'पिल्ला,
तुला पाहिजे ते
बिनधास्त कर...
तुझा बाबा आहे ना!' "
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर. मुंबई
दिनांक: १०/०७/२०२६ वेळ: ०६:४८
Post a Comment