कविता - तिरंगा - रसग्रहण - सौ. सुनिशा कुलकर्णी

*कविता  रसग्रहण* 

# *तिरंगा*#

     कवी श्री गुरुदत्त वाकदेकर ह्यांची "तिरंगा" कविता वाचल्यावर राष्ट्र भावनेतून स्फुरलेल्या शब्दांना, भावनेच्या आल्हादकतेला, रसिकांनी मनामनांत भरून ठेवाव आणि मग हृदयाच्या अवकाशात तोच *तिरंगा* ध्वज डौलाने, अभिमानाने ,फडकू लागवा. राष्ट्रभक्तीची जाज्वल्यता ओसंडून वाहू लागावी अशीच भावना कवीच्या मनात असावी असे वाटते. आणि तसे घडतेही

केसरात आसमंत सजताना, वसुंधरेने हिरवाईत नटावे /

अलगद शुभ्र ढग जमताना आकाशाने निळा येत रंगावे//

कवी म्हणतात--

       केशरी आसमंत आणि हिरवाईत नटलेली वसुंधरा ह्यांच्यामध्ये अलगद विहरणारे पांढरे ढग असे तिरंग्याचे तीनही  रंग मनाच्या कॅनव्हासवर अवतरतात. उत्साहाने, स्वतंत्रपणे फडकणारा तिरंगा ध्वज मनाला उभारी देऊन जातो. निळाईत रंगलेले ते अशोकचक्र समर्थपणे मनांत रेखाटले जाते. आणि असा तो परिपूर्ण तिरंगा देशवासीयांच्या मनात देशभक्तीचा दीप तेवत ठेवतो. अासमंताचे सजणे, वसुंधरेचे नटणे, आकाशाचे निळाईत रंगणे, नी पांढऱ्या शुभ्र ढगांचे लिलया विहरणे ह्याचा संबंध कवी,  राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांशी खुमासदारपणे लावून टाकतो.

*इंच इंच या जन्मभूमीचा गौरव अन्न अभिमानाचा/ तिच्या रक्षणासाठी सज्ज त्याग करण्या ह्या देहाचा//*

     राष्ट्रध्वज हा प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असतो. राष्ट्रप्रेमाचा तो मानबिंदू असतो. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज प्रथम मानाने फडकला त्यामागे कित्येक शूर वीरांचे रक्त सांडलेले आहे. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र होण्याचा अधिकार असतो आणि त्यासोबत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे कर्तव्यही अस्तित्व घेऊन अवतरत असते. या भावनेची कवीला जाणीव आहे. कवी म्हणतो, "मायभूमीचा गौरवास्पद व अमूल्य असा प्रत्येक इंच मी माझ्या मनाच्या आसमंतात अभिमानाने जतन करतो" हा देश प्रेमाचा भावनावेग एवढ्यावरच थांबत नाही. देशाचे सैन्यदल तसेच देशरक्षणासाठी परकीय आक्रमण तत्परतेने कौशल्याने परतावून लावतो. त्याबद्दल कवीचे विचार, मिळालेल्या कांचनी स्वातंत्र्याचे काळजीपूर्वक जतन करण्यास तत्परता दाखवतात. 

*हे मायभूमी ऋण तुझे, सांग मी कसे फेडावे/ केवळ तुझ्या रक्षणासाठी या देहाने कामी यावे//*

पुढे तो म्हणतो, "मातृभूमीच्या रक्षणासाठी मी माझ्या देहाचा त्याग करण्यास क्षणाचाही विलंब लावणार नाही." कवी नुसते प्रेम करून थांबत नाही तर त्या प्रेमाच्या जतनासाठी प्राणाचीही पर्वा करीत नाही. मला प्रेमातीशयाने दिव्यावर झेप घेणाऱ्या पतंगाची आठवण इथे आल्यावाचून राहात नाही.

*या रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्याच कामी यावा मरतानाही तुझाच टिळा माझ्या भाळी सजावा*

     या भूमीत जन्म मिळाला म्हणून स्वतःला धन्य समजणारा कवी तिचे हे ऋण फेडण्यास धडपडत आहे. आई थोर तुझे उपकार असे भाव तो व्यक्त करीत आहे. परकीय अाक्रमणां सोबतच वेळोवेळी देशावर येणाऱ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक, भावनिक आणि सर्वात महत्त्वाचे स्वातंत्र्य-समता- बंधुता ह्या ‌‌त्रयींवर जर संकट आले तर त्यात खारीचा वाटा उचलतांना, 'ह्या देहाने कामी यावे' असे त्याला वाटतांना जाणवते. 

*एका गोळीने छाताडावर मायभू तुझेच नाव कोरावे/*

*सरणावर जाण्याआधी मला तिरंग्यातच छान सजवावे//*

     देशाचे इंच इंच रक्षण करतांना कवीला आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे समर्पण अपेक्षित आहे आणि मृत्योपरांत मातेच्या पवित्र मृत्तिकेचा टिळा भाळी सजावा असेही त्याला वाटते. येथे प्रेमरसाचे वीररसात रूपांतर होते व वात्सल्य रसाची अनुभूती कवी अपेक्षित करतो.

       देशप्रेमाने पछाडलेला त्याचा भाव मृत्युला घाबरत नाही. 'देशासाठी प्राणार्पण' हे तो त्याचे सदभाग्य समजतो. वीराला मृत्यूचे भय नसतेच कारण रक्षण कर्त्यांचे काम तो निष्ठेने, आत्मसमर्पण भावनेने करीत असतो.

     'तिरंगा' कवितेतून व्यक्त होतांना तो त्याच्या निधड्या छातीवर बंदूकीच्या गोळीने मायभूमीचे नाव कोरले जावे अशी तीव्र इच्छा व्यक्त करतो तेव्हा वीर रसाचा परमोच्च बींदू गाठल्याचे प्रतीत झाल्यावाचून राहात नाही. आपल्या अंत्यसमयी भूमातेच्या अंकावर  पहूडण्यात धन्यता मानणारा तो, एक अत्यंतिक तीव्र अपेक्षा प्रकट करतो. ती म्हणजे तिरंग्यात त्याचे पार्थिव सजवले जावे, मगच सरणावर ठेवून अग्नी प्रदिप्त व्हावा. याचा अर्थ असाच असावा की आपले जीवन देशासाठी आणि फक्त देशसेवेत संपावे! शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीने लढणाऱ्या अभिमन्यूची आठवण येथे आल्या वाचून रहात नाही हेच खरे!

     मला वाटते हा कवी स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,  ह्यांच्या रक्ताच्या वंशवेलीतला असावा किंवा देशाला योग्य त्या सुंदर आकारात आणण्यासाठी प्रयत्नशील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभाई पटेल, ज्योतिबा फुले, रतन टाटा, अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, ह्या व्यक्तीमत्वाने प्रेरित झालेला असावा. राजा छत्रपतींसोबत सिंहाचा छावा असलेला शंभुराजा ह्यांना कवीने हृदयात पेरून त्याला आता कोंब फुटलेले असावेत.

     चपखल अर्थ प्रतीत करणारे शब्द, सोज्वळ नी स्वच्छ भावना नी अनन्यसाधारण कल्पना ह्या सार्‍यांची अनुभूती कवितेतून जाणवत जाते आणि अत्युच्च बिंदूला पोहोचून कविता संपते हे कवितेच्या यशाचे रहस्य मला जाणवते. ही आत्मसमर्पणाची भावना वाचकांच्या मनाच्या गाभार्‍यात दृढ करत कवी स्वतःला सादर करतो. कवीबद्दल सांगावे वाटते की 'आडात आहे म्हणून पोहऱ्यात आले आहे' अशा अनेक कविता त्यांच्या आपण पाहू शकतो. विविध साहित्य स्पर्धांमध्ये शंभर पेक्षा जास्त पुरस्कार आणि सन्मान प्राप्त. अशा या कवी बद्दल थोडक्यात, 'कविता जगणारा कवी म्हणजे गुरुदत्त' म्हटले तर मुळीच वावगे ठरू नये.

     इथे कवी आपल्या भावना चढत्या भाजणीतून कडव्यांच्या रूपात आपल्यासमोर सादर करतो शब्दांचा अर्थात्मतक ताल त्यात जाणवतो. भावनात्मक क्लायमॅक्स उत्तम जमला आहे. राष्ट्राप्रती भक्तीरसाने, शौर्यरसाने, करूणरसाने व अंती ममतामयी मातेच्या वात्सल्यरसाने परीपूर्ण आहे.


~ सौ. सुनिशा कुलकर्णी

४०४, ६सी, गिरीशिखर सोसायटी,

न्यु म्हाडा कॉलनी, न्यु दिंडोशी, गोरेगाव (पूर्व)

मोबाईल नंबर:९९६९७३८६३७


https://youtu.be/dcxOLkaKn-8?si=XdZ4FTgIlFGWfTRm*

👆 युट्युबवर हे रसग्रहण नक्की बघा 🙏😊

Post a Comment

Previous Post Next Post