अनुभव कथन - अभिजात पुस्तक प्रदर्शन – शब्दांसोबतच्या प्रवासाचा सोहळा


अभिजात पुस्तक प्रदर्शन – शब्दांसोबतच्या प्रवासाचा सोहळा

शब्द हे केवळ लिहिलेले नसतात, ते मनाच्या खोल कप्प्यात घर करून राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजात पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा, हे शब्द नुसतेच वाचले नाहीत, तर ते अनुभवले, जाणवले आणि आत्मसात केले.

पुस्तकं हा माणसाचा सर्वात जिवलग सोबती! तो नव्या जगाची दारं उघडतो, काळाच्या पल्याड घेऊन जातो आणि विचारांना नवा आयाम देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५ हे असंच एक ज्ञानाचं भव्य दालन होतं. ""मराठी साहित्य आणि कला" चे सेवेकरी विक्रांत लाळे, किरण जाधव, अनुज केसरकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि या शब्दांच्या महासागरात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.

इतिहासाशी जुळले धागे

या प्रदर्शनात एका विलक्षण क्षणाने आम्हाला भारावून टाकलं—दुर्ग भ्रमंती करणारे आणि तब्बल ३५ ऐतिहासिक ग्रंथांचे लेखन करणारे आप्पा परब यांच्यासोबत तब्बल १५-२० मिनिटं मनमोकळ्या गप्पा झाल्या. इतिहास हा केवळ पुस्तकांत नाही, तर तो अशा ज्ञानी व्यक्तींमध्येही जिवंत असतो, याची प्रचिती आली. मराठ्यांच्या गड-किल्ल्यांपासून ते ऐतिहासिक लढायांपर्यंत अनेक संदर्भ त्यांनी उलगडले, भूतकाळ फक्त पानांपुरताच मर्यादित नसतो, तर तो शब्दांमधून जिवंत होतो, याची जाणीव झाली. त्यांच्या तोंडून गड-किल्ल्यांच्या गोष्टी ऐकताना असं वाटलं, जणू आम्हीही त्या रणसंग्रामातले योद्धे आहोत, जणू सिंहगडाच्या भिंतींवर आमच्या पावलांचे ठसे उमटत आहेत. ज्ञानाचा हा अखंड प्रवाह आमच्या मनाच्या सुपीक जमिनीत रुजला आणि नव्या विचारांना अंकुर फुटले आणि आम्ही त्या अमूल्य ज्ञानाच्या धबधब्यातील काही थेंब हळुवार वेचले.

वाचनसंस्कृती जिवंत ठेवणाऱ्या अनेक लेखक, प्रकाशक आणि वितरकांशी यानिमित्ताने भेट झाली. संवाद होत होते, नाती जुळत होती, आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होत होत्या. महापौर पुरस्कारप्राप्त शिक्षिका आणि १२ पुस्तकांच्या लेखिका जयश्री हेमचंद्र चुरी यांची काही पुस्तके प्रदर्शनात नजरेत आली. या मौल्यवान पुस्तकांपैकी काही विकत घेऊन ती किरण जाधव यांना भेट दिली. हे प्रदर्शन म्हणजे फक्त ग्रंथसंपदेचं नव्हतं, तर विचारांची देवाणघेवाणही होती. विविध विषयांवरच्या पुस्तकांना हात लावताना, चाळताना, काही विकत घेताना मन असीम समाधानानं भरून गेलं. पुस्तकांमधून केवळ गोष्टी नाही, तर जीवनाचा अनुभव मिळतो. 

केवळ साहित्यच नव्हे, तर मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. अभिनेते सुनील तावडे यांच्याशी किरण जाधव याने संवाद साधला आणि काही आठवणी छायाचित्रांमध्ये कैद झाल्या. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकारांचा पुस्तकांशी असलेला हा ऋणानुबंध पाहून मन आनंदित झालं.

राजकीय मान्यवरांचं पुस्तकप्रेम

पुस्तकांप्रती ओढ असलेले अनेक राजकीय मान्यवरही या प्रदर्शनाला भेट द्यायला आले होते. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे आणि मनसेचे नितीन सरदेसाई यांनी येथे हजेरी लावून आपली वाचन आवड जपत पुस्तकांची खरेदी केली.

. . . .अन् अवघं मनच तिथं राहिलं!

चार-पाच तास पुस्तकांच्या संगतीत कसे निघून गेले, कळलंच नाही. हजारो रूपयांची पुस्तकं विकत घेतली, पण मनाचं समाधान होत नव्हतं. विविध साहित्य प्रकारांची चव चाखताना पुस्तकांच्या पानांमध्ये मन इतकं गुंतून गेलं, की जरी शरीर प्रदर्शनाच्या बाहेर पाऊल टाकत  होतं, घरी पोहोचलो तरी मन मात्र अजूनही त्या सुवासिक ग्रंथांच्या सहवासातच होतं. जणू मन तिथंच राहिलं… त्या पुस्तकांच्या रचनेत, त्या गंधात, त्या जिवंत संवादात…!

वाचनप्रेमींसाठी सजलेल्या ग्रंथसोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद शब्दांत मांडणं कठीण आहे. पण नक्कीच, ही एक अशी आठवण ठरली जी पुस्तकाच्या प्रत्येक पानासोबत जिवंत राहील! आता घरी पोहोचलो, हातात नवी पुस्तकं आहेत, पण मन अजूनही त्या प्रदर्शनाच्या गजबजलेल्या शांततेत हरवलेलं आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०२/०३/२०२५ वेळ : ०४:४४

Post a Comment

Previous Post Next Post