कविता - आयुष्याचे रंग साठवू या!
आयुष्याच्या वाटेवरती,
रंग किती पसरलेले,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
क्षण किती विस्कटलेले।
हसताना डोळे पाणावले,
आठवणींनी मन भरून गेले,
पण आज नका थांबू मुळी,
आनंदाचे रंग उधळू या,
दुःखाचे रंग पुसून टाका,
सुखाचे रंग साठवू या!
मान्य आहे, काळ कठीण,
जीवनाच्या वाटा खडतर,
पण आशेची किरणं येतील,
घेऊन नव्या उमेदिचा आधार।
एका वेदनेत अडकू नका,
एका अपयशात हरवू नका,
चुकांपासून शिकत पुढे चला,
संधीचे क्षण साठवू या!
उभे राहा पुन्हा नव्याने,
सूर्यकिरण साठवू या,
स्मितहास्य फुलवा ओठी,
सप्तरंगांशी नाते जोडू या!
हवा गंधाळली प्रेमाने,
फुलांनी रंग सजवले,
कळी कळीने उमलताना,
संदेश नव्या आशेचे दिले।
उमलणाऱ्या प्रत्येक फुलासारखे,
आपणही नव्याने फुलू या,
स्वप्नांचे हे सोनेरी क्षण,
आयुष्यभर साठवू या!
आज नका कोरडे राहू,
फाल्गुन रंगांनी खेळू या!
नदी म्हणते, वाहत राहा,
थेंब थेंब सागर होतो,
हवा म्हणते, मुक्त जगा,
क्षितिजही कवेत येतो।
चंद्र म्हणतो, शांत राहा,
अंधारातही झगमगा,
सूर्य म्हणतो, तेज बना,
तप्त भूमीत अंकुर फुलवा!
चला, नवी गाणी गाऊ,
आशेचे सूर साठवू या,
होळीच्या या रंगांमध्ये,
आयुष्याचे रंग साठवू या!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १३/०३/२०२५ वेळ : ०४:०९
Post a Comment