दोन दशकांपूर्वी, जेव्हा भारतात इंटरनेटचे युग सुरू होत होते,
तेव्हा ना सर्च इंजिन होते ना समाज माध्यमं. बातम्यांच्या वेबसाइट्स आणि ईमेल ही इंटरनेट
क्रांतीची वाहने बनली. पण २००५ मध्ये गुगलच्या प्रवेशाने त्याची व्याप्ती वाढू लागली.
सर्च इंजिन आले. युनिकोडमुळे स्वतःच्या भाषेत मजकूर पाहण्याची वाचण्याची सोय मिळाली
आणि इंटरनेटची क्रांती झाली.
प्रथम ब्लॉग, नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने लोकांना मोठ्या
प्रमाणावर जोडले. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशनच्या या वर्षीच्या मे महिन्यातील अहवालानुसार,
इंटरनेटच्या एकूण सक्रिय वापरकर्त्यांची संख्या ७५९ दशलक्ष (७५.९ कोटी) वर पोहोचली
आहे. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींवर पोहोचेल. त्यापैकी ग्रामीण भागात ३९.९ कोटी
आणि शहरी भागात ३६ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. पुरुष आणि स्त्रिया समान रीतीने इंटरनेट
वापरत आहेत आणि असोसिएशनला अशी अपेक्षा आहे की २०२५ पर्यंत, भविष्यात इंटरनेट वापरकर्त्यांच्या
संख्येत ६५ टक्के वाटा स्त्रियांचा असेल. स्त्री असो वा पुरुष, आता इंटरनेट असलेला
स्मार्टफोन हाच त्यांचा जीवनसाथी आहे. बहुतांश माहिती, मनोरंजन, काम, आर्थिक व्यवहार
मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. अशा परिस्थितीत नग्नता आणि पॉर्न कंटेंट
असणार नाही याची कल्पनाही करू नये. जगातील सर्व देशांमध्ये पॉर्न कंटेंटला मागणी आहे
आणि पॉर्न कंटेंटच्या माध्यमातून इंटरनेटवर सुमारे १०० अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत असल्याचा
अंदाज आहे. ही युरोपीय देशांची किंवा अमेरिकेची समस्या नाही तर ती व्यक्तीच्या गरजेनुसार
एक सेवा आहे जी अब्जावधीमध्ये आर्थिक उलाढाल करते.
आकडेवारीनुसार एकट्या अमेरिकेत १०० हून अधिक कंपन्या पॉर्न व्यवसायात
गुंतलेल्या आहेत आणि त्यांची स्वतःची युनियन देखील आहे. ते ह्ता गोष्टीकडे निव्वळ व्यवसाय
म्हणून बघतात आणि त्यांनी तयार केलेला आशय जगभर दिसतो. या देशांवर संस्कृतीचे किंवा
नैतिकतेचे इतके ओझे नाही. त्यामुळे तिथली सरकारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी
कठोर पाऊले उचलत नाहीत. होय, या व्यवसायात मुलांचा वापर होऊ नये यासाठी अमेरिकेने निश्चितपणे
कायदे केले आहेत, बाकीचा पॉर्न व्यवसाय त्यांच्यासाठी सॉफ्ट पॉवरसारखा आहे ज्याचा वापर
त्यांना "चातुर्याने" कसा करायचा हे देखील माहित आहे. पण भारत किंवा चीनसारख्या
देशांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या या पॉर्न व्यवसायाची अडचण आहे. याचे कारण
येथील लोकांची सामाजिक रचना आणि मानसिकता आहे. जर आपल्या समाजात सेक्स किंवा पॉर्न
हा सार्वजनिक चर्चेचा विषय नसेल तर तो सार्वजनिक प्रदर्शनाचा विषय कसा होऊ शकतो? त्यामुळेच
भारतासारख्या देशात पॉर्न सामग्रीबाबत वेळोवेळी भुवया उंचावल्या जातात. काही वर्षांपूर्वी
२०१८ मध्ये केंद्र सरकारने ८५७ वेबसाइट्सवर बंदी घातली होती, ज्यापैकी बहुतांश पॉर्न
वेबसाइट होत्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील पॉर्न वेबसाइट्सचा प्रसार आणि
त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही.
स्वस्त साहित्याच्या नावाखाली 'मस्तरामच्या कथा' वाचून भावनोत्कटता
मिळवण्याची कल्पना करणाऱ्यांनी इंटरनेटवर असे करण्याचे नवे मार्ग शोधले. या पद्धतींमध्ये
सॉफ्ट पॉर्न हे एक प्रमुख माध्यम बनले. ओटीटी प्लॅटफॉर्मचा उदय आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या
विस्तारामुळे सॉफ्ट पॉर्नला भारतात एक मोठी व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. हे देखील
भारताच्या मस्तराम मानसिकतेशी सुसंगत होते आणि त्यात फारसे कायदेशीर अडथळे नव्हते.
इंडिया पॉलिसी फाउंडेशन या भारतीय संशोधन संस्थेने या विषयावर
एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. "डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनियंत्रित सामग्री
आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम" मध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, डिजिटल
मीडिया किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एक ठिकाण बनले आहे जिथे समाजाला आक्षेपार्ह
सामग्री दिली जात आहे. याचे नियमन न केल्यास समाजावर फार वाईट परिणाम होईल. अहवालात
असे म्हटले आहे की, फेसबुकच्या अंतर्गत सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, इतर सोशल
मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत वापरकर्ते फेसबुकवर अशा आशयाच्या सामग्री अधिक प्रमाणात
पाहतात. फेसबुकने या प्रकारच्या सामग्रीबाबत काही उपाययोजना केल्या आहेत परंतु त्या
केवळ दिखाऊपणाच्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे फेसबुकशी संबंधित इतर प्लॅटफॉर्म,
इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप देखील पॉर्न आणि सेमी-पॉर्न सामग्रीचे केंद्रे बनली आहेत.
तज्ज्ञांना सामग्रीपेक्षा त्यांच्या सादरीकरणाची जास्त काळजी वाटते. यामध्ये भाऊ-बहिणी,
वहिनी-दिर, सासरा-सून आणि सासू-जावई यांच्या पलीकडे जाऊन भारतीय कुटुंबातील सामाजिक
संबंधांमध्ये प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित होताना दाखवले आहेत. दुर्दैवाने,
कुटुंब, समाज किंवा नातेवाइकांमध्येही लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात असा चुकीचा
संदेश ही सामग्री पाहणाऱ्यांना दिला जातो.
डिजिटल मीडियाचा एक दुष्परिणाम असा आहे की, येथे जे दिसत आहे
ते पाहणारे पूर्णपणे एकांतात पाहात असतात. यामुळे जिज्ञासू व्यक्तीसाठी तो माहितीचा
स्रोत असला तरीदेखील वासनांध व्यक्तीसाठी वाममार्ग खुला करतो. पण अमेरिका किंवा युरोपात
वसलेल्या अशा कंपन्या सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांवर विश्वास ठेवत नाहीत किंवा त्यांना
जाणीवपूर्वक ही बंधनं झुगारायची असतात. त्यामुळे लहान मुलांचे लैंगिक शोषण किंवा त्यांची
नग्नता इत्यादींशी संबंधित सामग्री रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात, परंतु वयस्कांसाठी
बनवलेल्या पॉर्न, अर्ध-पॉर्न सामग्रीमध्ये कोणत्याही प्रकारची कौटुंबिक आणि सामाजिक
व्यवस्था विचारात घेतली जात नाही.
इंडिया पॉलिसी फाऊंडेशनच्या अहवालात डिजिटल माध्यमांच्या नियमनाद्वारे
अशा प्रकारची सामग्री थांबवण्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे, परंतु तसे करणे कठीण
आहे. पॉर्नहब सारख्या वेबसाईट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे पण या रिपोर्टनुसार
लोक ती व्हीपीएनवर पाहतात. इंटरनेटवर असे बरेच मार्ग आहेत ज्यामुळे आपण सहजपणे कोणतेही
नियम मोडू शकता. मग ते सरकारी कायदे असो वा कॉपीराइट कायदे. इंटरनेट वापरकर्ते नेहमी
ते तोडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधतात. उदाहरणार्थ, टेलीग्राम हे मेसेजिंग अॅप म्हणून
सुरू झाले परंतु आता ते बहुतेक अश्लील सामग्री किंवा विनामूल्य चित्रपट पसरवण्यासाठी
वापरले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा
टेलिग्राम प्रत्येकाला वापरकर्त्यांची गरज असते. तो वापरकर्ता काय पाहतो किंवा वाचतो
याने त्यांना फारसा फरक पडत नाही. सर्च इंजिनच्या बाबतीतही असेच आहे. तुम्ही काय शोधता
त्याचा त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही. तुम्ही काहीही शोधत त्यांच्याकडे आलात, एवढेच
त्यांना हवे आहे. इंटरनेट वापरकर्ते बाजार आहेत. तो नसेल तर कोणाचाही धंदा चालणार नाही.
अशा परिस्थितीत, समाज माध्यमांचे अत्याधिक कायदेशीर नियमन या
बाजाराला कमकुवत करेल, जे कंपन्या कधीही होऊ देऊ इच्छित नाहीत. मग ओटीटी ते समाज माध्यमं
आणि डिजिटल मीडियापर्यंत पोर्न कंटेंटचा वापर फक्त भारत आणि चीनसारख्या देशांमध्येच
का वाढत आहे, याचा विचार करायला हवा. ही सामग्री तयार केली जात आहे आणि पैसे कमावले
जात आहेत कारण, येथे लोक ती सामग्री पाहात आहेत. सरकारने एका
ठिकाणी काही नियमावली आणली तर लोक दुसरा मार्ग खुला करतात. उल्लू ओटीटी प्लॅटफॉर्म
हे याचे उत्तम उदाहरण आहे, जे दरवर्षी १०० कोटी रुपये कमवत आहेत.
इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे पॉर्न कंटेंट
काही काळानंतर कोणासाठीही निरर्थक ठरतो. इंटरनेटवर बरेच लोक ते गुपचूप पाहत आहेत आणि
ते उपलब्ध झाल्यानंतरही ते पाहणे अनेकांना आवडत नाही. इंटरनेटचे आभासी जग हळूहळू लोकांना
परिपक्व बनवते. ज्यांना बघायचे आहे ते बघतात, इतर त्याकडे दुर्लक्ष करतात. इंटरनेटमुळे
निर्माण झालेल्या या आभासी जगाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल
की, इंटरनेट हे माहितीच्या एका मोठ्या जाळ्यासारखे आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे जीव
असतात. येथे येणाऱ्या व्यक्तीला अतिशय काळजीपूर्वक चालावे लागेल आणि या जंजाळात जगण्याची
कला शिकावी लागेल. हे या माध्यमाचे सत्य आहे, जे उशिरा का होईना आपल्या आजूबाजूच्या
लोकांना समजावून सांगावे लागेल अन्यथा ते माहिती आणि मनोरंजनाच्या या जाळ्यात काही
विषारी प्राण्यांचे बळी ठरतील.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/१२/२०२३ वेळ : १४४०
Post a Comment