नाताळच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नुकताच सिनेमागृहांत
प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ या चित्रपटात पंजाबमधील लालटू या छोट्याशा गावातील चार मित्र
डंकी मार्गाने तिकीट आणि व्हिसाशिवाय परदेशात जात असल्याची कथा दाखवण्यात आली आहे.
खरा 'डंकी मार्ग' कोणता आणि त्यात किती धोका आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तो निवडण्याची
गरज का निर्माण होते?
'डंकी मार्ग' हा एक धोकादायक, बेकायदेशीर आणि अवैध मार्ग आहे.
जो मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये
पोहोचण्यासाठी वापरतात. 'डंकी' या पंजाबी शब्दाचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
उडी मारणे. इतर अनेक देशांमध्ये, व्हिसा किंवा तिकीट नसताना, लपूनछपून अवैध मार्गाने
सीमा ओलांडणे म्हणजे उडी मारण्यासारखे आहे. या धोकादायक मार्गाचा वापर अमेरिकेत जाण्यासाठी,
पैसे कमविण्यासाठी आणि तेथे समृद्ध जीवन जगण्याचे स्वप्न पाहणारे लोक करतात. पंजाब,
हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील लोकांमध्ये 'डंकी मार्ग' अधिक
लोकप्रिय आहे, परंतु आता हे लोण हळूहळू इतर राज्यांतील लोकांमध्येही पसरले आहे.
'डंकी मार्ग' वापरण्यात अनेक धोके आहेत. बेकायदेशीरपणे परदेशात
प्रवेश करणे आणि पकडले गेल्यास तुरुंगात किंवा मूळ देशात परत पाठवण्याचे कायदे कठोर
आहेत. त्यात मृत्यूचा धोकाही असतो, कारण या मार्गाने जंगल, नद्या, समुद्र यातून जावे
लागते. मार्गामध्ये अनेक देशांतील सुरक्षा अधिकार्यांपअून लपणे आणि अनेक दिवस अन्नाशिवाय
घालवणे यांचा समावेश होतो. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही की श्वास घेण्यासाठी मोकळी
हवा नाही. वन्य प्राणी, गुन्हेगारी टोळ्या, दरोडेखोर आणि अगदी शारिरीक यातना यांचा
सामना होण्याचा धोका आहे. 'डंकी मार्ग' सुचवणारे दलालसुद्धा गरजेच्या वेळी मदतीसाठी
उपलब्ध नसतात. असे असूनही या दलालांनी मागणी केलेले पैसे देण्यासाठी लोक आपल्या जमिनी
आणि मालमत्ता विकतात.
लॅटिन अमेरिका: भारतातील सर्वात लोकप्रिय 'डंकी मार्ग' म्हणजे
लॅटिन अमेरिकन देशात पोहोचणे. इक्वेडोर, बोलिव्हिया आणि गयाना सारख्या देशांमध्ये भारतीय
नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. ब्राझील आणि व्हेनेझुएलासह इतर
काही देशही सहज व्हिसा देतात.
ग्वाटेमाला: ग्वाटेमाला हे या मार्गावरील प्रमुख केंद्र आहे.
मेक्सिकोमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि अमेरिकेच्या सीमेकडे प्रवास सुरू ठेवण्यासाठी
स्थलांतरितांना येथे नवीन तस्करांच्या स्वाधीन केले जाते. इथून लपाछपीचा खरा खेळ सुरू
होतो, कारण मेक्सिकोतून जाताना परप्रांतीयांना कडेकोट बंदोबस्तातून जावे लागते.
मेक्सिको आणि अमेरिकन सीमा: एकदा मेक्सिकोमध्ये प्रवेश केल्यानंतर,
स्थलांतरितांना अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्यासाठी धोकादायक भूप्रदेश आणि कठोर परिस्थिती
ओलांडणे आवश्यक आहे. जर ते यशस्वी झाले तर ते अमेरिकेमध्ये आश्रय किंवा इतर प्रकारच्या
कायदेशीर रहिवासासाठी अर्ज करू शकतात.
अमेरिकन कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (युएससीबीपी) नुसार,
दक्षिण-पश्चिम सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या अवैध स्थलांतरितांमध्ये भारतीय नागरिक
पाचव्या क्रमांकावर आहेत. युएससीबीपीच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर
२०२३ दरम्यान ९६,९१७ भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत सीमा ओलांडताना पकडले गेले. यापैकी
३०,०१० कॅनडा सीमेवर आणि ४१,७७० मेक्सिको सीमेवर पकडले गेले. युएससीबीपीच्या हवाल्याने
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, फेब्रुवारी २०१९ ते मार्च २०२३ दरम्यान, १,४९,०००
भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात
आले. यातील बहुतांश लोक गुजरात आणि पंजाबमधील होते. प्यू रिसर्च सेंटरच्या ताज्या अभ्यासानुसार,
अमेरिकेत ७,२५,००० पेक्षा अधिक भारतीय बेकायदेशीरपणे राहत आहेत.
५ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव
सिंह गोगामेडी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार रोहित गोदारा यानेही भारतातून पळून जाऊन
अमेरिकेत पोहोचण्यासाठी "डंकी मार्ग" वापरला होता. अहवालानुसार, रोहित गोदाराने
अमेरिकेत उतरण्यापूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ‘डंकी मार्ग’ वापरला
होता.
अशीच एक घटना जुलै २०२३ मध्ये समोर आली होती. २६ वर्षीय गुंड
दीपक पहल उर्फ बॉक्सर याने २३ ऑगस्ट २०२२ रोजी बुरारी, उत्तर दिल्ली येथे एका बांधकाम
व्यावसायिकाच्या हत्येनंतर भारतातून पळून जाण्यासाठी "डंकी मार्ग" वापरला
होता. तथापि, विविध सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे बॉक्सरला मेक्सिकोमधील
विमानतळावरून अटक करण्यात आली.
अमेरिकेत किंवा कॅनडामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न
करणाऱ्या जवळपास सर्वच भारतीयांच्या अनेक संतापजनक कथा आहेत. अनेक लोक त्यांच्या गंतव्यस्थानी
पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबियांसह मरण पावले. पण या सर्व वेदनादायक घटनांनंतरही
जगभरातील लाखो लोक आपल्या सुखी भविष्याच्या शोधात अमेरिका, कॅनडा किंवा युरोप गाठण्याची
स्पर्धा करत आहेत. लबाड दलाल त्यांच्या ह्याच मानसिकतेचा फायदा घेत व्हिसाशिवाय परदेशात
पाठवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची कमाई करतात.
अनेक प्रकरणांत मुलांकडून त्यांच्या पालकांच्या असलेल्या अवास्तव
आशा आणि अपेक्षा ह्याचे मूळ कारण असल्याचे एका अहवालानुसार सिद्ध होते. भारतासह अनेक
देशांचा समावेश असलेल्या या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पालकांच्या आकांक्षा
विकसनशील आणि विकसित दोन्ही देशांमध्ये भिन्न नसल्या तरी त्यांच्यामध्येही अशी काही
क्षेत्रे आहेत जिथे त्यांची प्राधान्ये मोठ्या प्रमाणात असतात. भारतीय पालकांच्या मनात
त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी अनेक अवास्तव कल्पना असतात. सर्वेक्षणात ५१% भारतीय
पालकांसाठी हे अंतिम उद्दिष्ट आहे. ह्या आकडेवारीत केवळ ५२% मेक्सिकन पालक भारतापेक्षा
पुढे आहेत.
तथापि, भारतीय पालक त्यांच्या मुलांसाठी इच्छुक असलेल्या उच्च
शैक्षणिक पात्रतेच्या किंवा राहणीमानाच्या बाबतीत जवळजवळ शीर्षस्थानी आहेत. प्रत्यक्षात
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ९१% भारतीय पालकांना त्यांच्या मुलांनी किमान
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यावे असे वाटत होते किंवा ८८% पालकांनी पदव्युत्तर
किंवा त्याहूनही उच्च पदवी मिळवावी अशी इच्छा होती. याउलट अमेरिकेमधील केवळ ६०% पालकांना
त्यांच्या मुलांनी पदवीपूर्व पदवी किंवा त्याहून अधिक पदवी प्राप्त करावी असे वाटत
होते तर केवळ ३१% पालकांनी पदव्युत्तर किंवा उच्च पदवीचे लक्ष्य ठेवले होते.
आशियाई देशांचा असा विश्वास आहे की, विद्यापीठीय शिक्षण पैशासाठी
चांगले मूल्य प्रदान करते. सिंगापूर (८४%), मलेशिया (७८%) आणि भारत (७८%) मध्ये विद्यापीठीय
शिक्षणासाठी सर्वाधिक रस्सीखेच करणारे पालक होते. तथापि, ब्राझील, तुर्की, मेक्सिको
आणि तैवानमधील अर्ध्याहून अधिक पालकांना विद्यापीठीय शिक्षण केवळ पैशांचा अपव्यय आहे
असे वाटते. त्याचप्रमाणे आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय शिक्षणाला
प्राधान्य देणाऱ्या इतर राष्ट्रांमध्ये हाँगकाँग (६२%), तैवान (५९%), इंडोनेशिया (५२%)
आणि सिंगापूर (५०%) यांचा समावेश होतो.
वरील सर्व गोष्टी निश्चितपणे दर्शवतात की, भारतीय पालकांच्या
मुलांकडून अवास्तव अपेक्षा आहेत आणि त्याचा परिणाम सहजपणे मुलांच्या मानसिकतेवर होतो.
त्यामुळे मुलांकडून परदेशात जाण्यासाठी विविध पर्यायांचा अतिरिक्त शोध सुरू होतो. त्यावेळी
अनेकांना ह्या डंकी मार्गाचा शोध लागतो. त्यामुळे आपल्या पाल्यांना परदेशी पाठवण्यासाठी
आतूर असलेल्या पालकांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/१२/२०२३ वेळ : २२००
Post a Comment