सुवर्णक्षण
१३.१२.२०२३
गोमूत्र
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हिंदू पट्ट्यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे हताश झालेल्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीने पुन्हा क्षुल्लक राजकारणाचा अवलंब केला आहे. किंबहुना, दरवेळेप्रमाणेच यावेळीही विरोधकांनी आपल्या पराभवाचे, अपयशाचे आणि त्रुटींचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. मात्र यावेळी हा विरोध एवढ्यापुरताच मर्यादित न राहता द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांनी लोकसभेत भाषण करून जनादेश उत्तर आणि दक्षिणमध्ये विभागण्याचा मानस व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हिंदी पट्ट्यातील गोमूत्रयुक्त राज्यांमध्येच भाजप निवडणुका जिंकते. काँग्रेसने त्यांचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. राजकीय स्वार्थ आणि संकुचित विचारसरणीमुळे भारत हजारो वर्षांपासून त्रस्त आहे.
प्राचीन हिंदू संस्कृती आणि परंपरेला नाकारण्याचे हे कारस्थान राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेतला सर्वात मोठा अडथळा आहे. गाय ही केवळ भारताची शाश्वत परंपरा नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनातील श्रद्धेचे सर्वोच्च केंद्र आहे. भारतीय गायीला गोमातेचा दर्जा देतात. आपल्या धर्मग्रंथात गायीला पूजनीय स्थान आहे. आपल्या माता-भगिनी जेव्हा स्वयंपाक बनवतात तेव्हा पहिल्यांदा नैवेद्य गायीला देतात. गाईचे दूध हे अमृततुल्य आहे. गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आणि अनमोल आहे. या दिव्य अमृत पंचगव्यांचा यज्ञ, आध्यात्मिक विधी, रोग बरे करण्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वापर केला जातो. त्यामुळे गाईच्या आडून भाजपवर हल्ला करण्याची ही पद्धत केवळ मानसिक दिवाळखोरी नसून भारतीयांच्या जनभावना दुखावण्याची नियोजनबद्ध खेळी आहे. यापूर्वीही असे प्रयत्न व कारस्थाने झाली आहेत. तेव्हाही गोमातेप्रमाणेच सनातन धर्मावर आक्षेप घेणाऱ्यांनी देश तोडण्याचा कट रचला होता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एका वादग्रस्त भाषणात सनातन धर्माची तुलना डेंग्यू, डास, मलेरिया आणि कोविड यांच्याशी केली होती आणि असंख्य सनातन धर्मीयांवर हल्ला केला होता. त्यांच्याच पक्षाचे द्रमुक खासदार ए राजा यांनी सर्व मर्यादा ओलांडून हिंदू धर्म हा केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शाप असल्याचे म्हटले होते.
द्रमुकच्या नेत्याने असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, ही काही नवीन गोष्ट नाही, याआधीही द्रमुकच्या नेत्यांनी अशी वक्तव्ये केलेली आहेत. द्रमुक खासदाराचे हे वादग्रस्त विधान उत्स्फूर्तपणे आलेले नाही, ते एका नियोजित रणनीतीचा भाग आहे. द्रमुकच्या नेत्यांनी 'सनातन'च्या संपूर्ण नाशाबद्दल बोलून त्याची तुलना एड्ससारख्या रोगाशी केली होती. अशा राजकारणाची खरच आवश्यकता आहे का? हिंदी भाषेचा मुद्दा असो, सनातन संस्कृतीचा असो किंवा उत्तर-दक्षिण वाद असो, त्यावर ते सातत्याने वादग्रस्त विधाने करतात. द्रमुक हा विरोधी आघाडी 'इंडिया'चा घटक आहे. त्यांच्या ह्या वक्तव्या विरोधात आंदोलनानंतर खासदाराने माफी मागितली, पण भाजपचा असा निषेध हा देशाच्या 'विविधतेत एकता' या संस्कृतीचा अपमान आणि उल्लंघन आहे. हे विधान लोकसभेत केले असले तरीदेखील कार्यवाहीच्या नोंदीतून काढून टाकण्यात आले आहे. पण हा अपमान कोणी आणि का सहन करावा?
या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त करत हे खेदजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्वतः सनातनी असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनीही द्रमुकची राजनीती वेगळी असल्याचे तसेच त्यांचे राजकारण काँग्रेसला मान्य नसल्याचे सांगितले. काँग्रेसही 'सनातन धर्म' आणि 'गोमातेची' पूजा करते. काँग्रेसची ही भूमिका खरी आहे की केवळ सत्ता मिळविण्याचे हत्यार? इंडिया आघाडीशी संबंधित एका पक्षाने सनातनी परंपरा आणि हिंदू भाषिक राज्यांचा प्रचंड अनादर केला आहे. सनातनी परंपरा आणि हिंदू राज्यांचा असा अवमान देश कसा सहन करेल? देशाच्या विश्वासाशी खेळणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांना जनता नक्कीच चोख प्रत्युत्तर देते आणि देत राहील.
हिंदी किंवा हिंदी भाषिक राज्यांच्या विरोधात द्रमुक पक्ष आणि त्यांचे नेते कोणत्या पातळीपर्यंत घसरणार हा प्रश्न आहे. हिंदी भाषिक राज्यांबाबत त्यांच्या मनातील या आडमुठेपणाने नक्की काय साध्य होणार आहे? यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. द्रमुकचे नेते थेट हिंदी भाषिक प्रांतात राहणाऱ्या लोकांचा अपमान करत आहेत. भाजपचा विजय जनभावनेचा विजय आहे आणि विजयाचा रथ हिंदी भाषिक राज्यांसह दक्षिण भारतात विजयाचा झेंडा फडकवत पुढे सरकत आहे. तेलंगणात भाजप एका जागेवरून ८वर सरकला आहे. केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपचे अस्तित्व जाणवत आहे. तेथे भाजप आपले पाय भक्कमपणे रोवून येणाऱ्या नजिकच्या काळात कधी सरकार स्थापन करेल हेदेखील त्यांना समजणार नाही. तीन राज्यांतील ऐतिहासिक विजयामुळे भाजपचे मनोबल उंचावलेले असतानाच इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे मनोधैर्य खचले आहे. विजयानंतर भाजप आणि मोदींच्या विचारसरणी, नवीन योजना आणि दूरदृष्टी याविषयी विरोधी पक्ष कितीही प्रतिक्रिया देत असले तरी त्यामुळे भाजपच अधिक सुरक्षित होणार आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसच्या दारुण पराभवामागे सनातनला विरोध, सनातनच्या विरोधावर मौन आणि मुस्लिम तुष्टीकरण ही प्रमुख कारणे आहेत यात शंका नाही. या पराभवावर एकीकडे काँग्रेसमध्ये जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे कथनाचा खेळही खेळला जात आहे. म्हणजे काँग्रेस पराभवातून धडा शिकायला तयार नाही. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कष्णम यांनी पक्षाला आरसा दाखवत सनातनच्या विरोधाने काँग्रेसला घेरल्याचे सांगितले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर डाव्या लिबरल समूहाने आणि काँग्रेस समर्थकांनी विविध प्रकारच्या कथा रचण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तरादाखल लिहिले, 'त्यांच्या अहंकारात, खोटेपणात, नैराश्यात आणि अज्ञानात ते आनंदी राहोत. पण त्यांच्या फुटीरतावादी अजेंड्यापासून सावध रहा. ७० वर्षे जुनी सवय इतक्या सहजपणे सुटू शकत नाही. या लोकांमध्ये अशी बुद्धी आहे की त्यांना भविष्यात आणखी अनेक संकटांसाठी तयार राहावे लागेल.' खरंतर ७० वर्षांपासून काँग्रेसचा खरा चेहरा आणि चरित्र हेच आहे. सनातन संस्कृतीच भारताचा आधार आहे. येथे कधीही जातीवाद नव्हता हे त्यांना समजू शकले नाही. काँग्रेसच्या तुष्टीकरणाची उंची पहा की उदयपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार गौरव वल्लभ यांनी दफनभूमीसाठी ५ एकर जमीन मोफत देण्याची घोषणा केली. ह्याच उदयपूरमध्ये कन्हैया लाल शिंप्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि हे प्रकरण देशभरात चर्चेत आले. या संपूर्ण प्रकरणाबाबत गेहलोत सरकार चौकशीच्या कक्षेत राहिले. सनातनचा विरोध आणि कन्हैया लालच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळे काँग्रेसला उदयपूर विधानसभा मतदारसंघात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. येथे भाजपचे ताराचंद जैन यांनी विजयाचा झेंडा फडकावला.
सनातन आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा गैरवापर आणि जिहादला प्रोत्साहन देऊन काँग्रेसचा कसा बोजवारा उडाला आहे, हे छत्तीसगडमधील एका उदाहरणावरून समजू शकते. छत्तीसगडमधील युवक भुवनेश्वर साहू (२४) याची जिहादींच्या एका जमावाने हत्या केली आणि त्याच्या कुटुंबाला काँग्रेस सरकारमध्ये न्याय मिळाला नाही. त्यांचे वडील ईश्वर साहू यांना भाजपने 'साजा' येधून तिकीट दिले. ईश्वर साहू यांनी काँग्रेसचे ४० वर्षे आमदार मंत्री रवींद्र चौबे यांचा १९,६०० मतांनी पराभव केला. रवींद्र चौबे हे छत्तीसगडमधील बघेल सरकारमध्ये कृषीमंत्री होते आणि सात वेळा आमदार राहिले आहेत. काँग्रेसने व्होट बँकेसाठी आणि मुस्लिमांना खूश करण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई केली नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा का मिळत नाही हे अशा निकालांमुळे प्रत्येक वेळी अधोरेखित होते. इंडिया आघाडीचा घटक असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी तुलसीदास आणि रामचरितमानस बद्दल अनेकदा वादग्रस्त शब्दावली वापरली आहे. हिंदू नावाचा कोणताही धर्म नसून तो ब्राम्हणांनी जाहीर केलेला धर्म आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हिंदू धर्म म्हणजे भंपकपणा आहे असेही म्हटले आहे.
शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे. सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. असे अनेक फायदे ज्या गोमूत्राचे आहेत त्याचे दोन चमचे विरोधकांना पाजल्यास त्यांच्याही मनातील दोष नष्ट होण्यास मदत होईल का यावर नक्कीच चिंतन करायला पाहिजे.
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : ०९/१२/२०२३ वेळ : २१४२
Post a Comment