एका शांत संध्याकाळी
मी माझ्याच मनासमोर
निःशब्द उभा होतो.
आरशात चेहरा दिसत होता,
पण प्रश्न डोळ्यांत नव्हता...
तो मनाच्या तळाशी धडधडत होता—
"नेमकं चुकलं कुठे?"
मन हलकंसं हसलं...
आणि म्हणालं—
"चूक एवढीच...
तू चेहरे वाचले नाहीस,
तू मनं वाचत राहिलास.
प्रत्येक नजरेत
आपलेपण शोधत राहिलास."
तू नाती जपलीस,
त्यांनी गरजा जपल्या.
तू विश्वासाची बीजं पेरत गेलास,
ते फायद्याची गणितं मांडत गेले.
तू शब्दाला श्वासासारखं जपलंस,
ते वचनांचे अर्थ बदलत राहिले.
काही चेहऱ्यांवर हसू होतं,
पण डोळ्यांच्या तळाशी
स्वार्थाची सावली
दाटून बसली होती.
तू मनाने श्रीमंत होतास.
म्हणून हरलास,
असं जगाला वाटलं.
पण हरलं होतं
तुझं मन नव्हे...
त्यांच्यातली माणुसकी.
खूप उशिरा
एक सत्य उमगलं—
प्रत्येक नातं
हृदयातून जन्मत नाही.
काही नाती
गरज असेपर्यंतच
सोबत चालतात.
गरज संपताच
पावलांच्या दिशा
बदलून जातात.
तरीही तुझं मन
आजही तसंच आहे.
कारण
निर्मळ राहणं
हीच जगण्याची
सर्वांत मोठी ताकद असते.
मन पुन्हा हसलं...
आणि हळूच म्हणालं—
"ज्यांनी तुझ्या मनाचा स्पर्श
जपून ठेवला,
तीच तुझी माणसं.
बाकीचे
तुझ्या सावलीत
क्षणभर थांबले,
पण
तुझ्या प्रकाशाचे
कधीच झाले नाहीत.
लक्षात ठेव—
सुगंध फुलापासून
वेगळा होत नाही.
तसंच
निर्मळ मनाचं माणूसपण
काळाच्या कोणत्याही वादळात
आपला सुगंध गमावत नाही."
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ३१/०७/२०२६ वेळ: ०३:३३
Post a Comment