कविता – मानलेला बाप


कविता – मानलेला बाप
 
रक्ताच्या नात्यालाच 
नेहमी जन्म मिळतो, 
पण प्रेमाच्या नात्याला 
मन जन्म देत असतं.
 
मानलेला बाप 
हा कुणाच्या आयुष्यात 
पहिल्या पसंतीचा विषय नसतो, 
तो अनेकदा 
परिस्थितीने लिहिलेलं 
एक न वाचलेलं पान असतं.
 
जसा प्रश्नपत्रिकेतला 
पर्यायी प्रश्न, 
हवे तर निवडायचा, 
नको तर सहज सोडून द्यायचा.
 
जसा गाडीच्या डिकीत 
निःशब्द पडलेला 
स्टेपनीचा टायर, 
रस्ता अडला तरच 
ज्याची आठवण होते.
 
तो कधीच विचारत नाही, 
"आता माझी आठवण आली का?"
 
तो फक्त म्हणतो, 
"तुझा प्रवास थांबू नये, 
एवढंच माझं स्वप्न."
 
त्याच्या खांद्यावर 
आडनावाचा अधिकार नसतो, 
पण जबाबदारीचा भार असतो.
 
त्याच्या डोळ्यांत 
स्वतःसाठी अपेक्षा नसतात, 
फक्त लेकराच्या भविष्यासाठी 
निर्मळ प्रार्थना असते.
 
तो रागावतो, 
मालकीने नाही; 
काळजीने.
 
तो हसतो, 
स्वतःसाठी नाही; 
लेकराच्या हास्यात 
स्वतःचं आयुष्य शोधत.
 
कधी कधी 
त्याचं अस्तित्व 
घरात असतं, 
पण त्याचं नाव 
कुटुंबाच्या गोष्टीतही 
उच्चारलं जात नाही.
 
तरीही 
तो उंबरठ्यासारखा उभा राहतो, 
सगळ्यांचे पाय सांभाळत, 
स्वतः मात्र 
सतत झिजत राहतो.
 
जग 
रक्ताच्या नात्यांचा 
हिशेब मांडत राहतं, 
तो मात्र 
मायेचा लेखाजोखा 
कधीच ठेवत नाही.
 
खरा बाप 
तो नसतो 
ज्याने जन्म दिला; 
खरा बाप तोच असतो 
ज्याने आयुष्याला अर्थ दिला.
 
मानलेला बाप 
हा पर्याय नसतो, 
तो नियतीने दिलेला 
दुसरा श्वास असतो.
 
आणि ज्यांना 
असा बाप लाभतो, 
त्यांनी लक्षात ठेवावं—
काही नाती 
केवळ रक्तानेच 
जुळत नाहीत; 
एखाद्या माणसाच्या 
रोजच्या त्यागातून, 
निःशब्द मायेच्या स्पर्शातून, 
आणि निरपेक्ष प्रेमातून 
जन्माला येतात.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक: १८/०७/२०२६ वेळ: २१:५१

Post a Comment

Previous Post Next Post