कविता – “आम्ही आमचं बघू…”
घड्याळाच्या काट्यांसोबत
धावत असतो एक बाबा,
मुलांच्या सुखासाठी
सगळी स्वप्नं बाजूला ठेवून उभा असतो.
“बाळांनो, वेळेवर घरी या…”
एवढंच तर सांगतो तो,
पण उशीर झाला की
त्याचा जीव घराच्या दाराशी अडकून राहतो.
दारातला दिवा तेवत असतो,
डोळे रस्त्याकडे लागलेले असतात,
कारण मुलांच्या पावलांचा आवाज
बाबांच्या मनाला शांत करून जातो.
“वेळेवर जेवण करा,
उपाशी राहू नका…”
या शब्दांमध्ये
फक्त सूचना नसतात,
तर लेकरांसाठीची
मनापासूनची काळजी असते.
“आजारी असाल तर
औषध वेळेवर घ्या,
पाणी भरपूर प्या…”
असं सांगताना
फक्त शब्द बाहेर पडत नाहीत,
तर काळजीने भरलेले
बाबांचे डोळे बोलत असतात.
“शाळा, कॉलेजला जाताना
डबा सोबत घेऊन जा…”
हे सांगताना
त्यांना स्वतःच्या घासाची आठवण नसते,
फक्त मुलांनी वेळेवर खावं
एवढीच इच्छा असते.
पण एक दिवस मुलं म्हणतात—
“आम्ही आमचं बघू…”
क्षणभर शांत होतो बाबा,
शब्द ओठांवरच थांबतात,
मनाच्या एका कोपऱ्यात
हळूच काही अश्रू दाटतात.
राग नसतो त्याला,
कारण त्याला माहीत असतं—
मुलं मोठी होत आहेत,
स्वतःचा मार्ग शोधत आहेत.
तरीही मनात कुठेतरी
एक प्रश्न उमटतो—
“कालपर्यंत माझा हात धरून
चालणारी माझी लेकरं,
आज स्वतःच्या पायावर
उभी राहायला शिकत आहेत…
मी अजून काही सांगू का?
की आता गप्प राहून
फक्त आशीर्वाद देत राहू?”
मग बाबा थोडा मागे सरकतो,
पण काळजी मात्र कमी करत नाही.
मुलं कितीही दूर गेली,
तरी त्यांच्यावरचं प्रेम
कधीच कमी होत नाही.
मुलांना वाटतं,
“बाबा नेहमी सांगत राहतात…”
पण त्या प्रत्येक शब्दामागे
त्यांचं संपूर्ण आयुष्य लपलेलं असतं.
स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून
ज्याने मुलांची स्वप्नं जपली,
स्वतःच्या घासातील वाटा कमी करून
ज्याने मुलांची भूक भागवली.
स्वतःची स्वप्नं अपुरी ठेवून
ज्याने मुलांची स्वप्नं पूर्ण केली,
स्वतःच्या थकलेल्या पावलांनी
ज्याने मुलांसाठी वाट तयार केली.
मुलांच्या हसण्यात आनंद मानणारा,
त्यांच्या यशात अभिमान शोधणारा,
आणि त्यांच्या दुःखात
मनातून अस्वस्थ होणारा
तोच तर बाबा असतो.
रात्र झाली तरी
दाराकडे पाहणारे डोळे,
फोनच्या एका आवाजाची वाट पाहणारं मन,
आणि ओठांवरची एकच प्रार्थना—
“माझी मुलं सुखी राहोत,
निरोगी राहोत,
नेहमी आनंदात राहोत…”
काळ पुढे जातो,
मुलं मोठी होतात,
स्वतःचे निर्णय घेतात,
आपल्या आकाशात उंच भरारी घेतात.
पण एक दिवस मागे वळून पाहताना
त्यांना जाणवतं—
“बाबांनी सांगितलेले ते चार शब्द
फक्त सूचना नव्हत्या,
तर आमच्यासाठी धडधडणारं
त्यांचं प्रेमळ हृदय होतं…”
“आम्ही आमचं बघू…”
हा शब्द आमच्या स्वावलंबनाचा असेल,
पण बाबांसाठी तो क्षण
आमचं बालपण हळूहळू
दूर जात असल्याची जाणीव असते.
कारण बाबा कधीच
मुलांचं आयुष्य जगत नाहीत,
पण मुलांसाठी
आपलं संपूर्ण आयुष्य जगतात.
जगाच्या गर्दीत
मुलं कितीही दूर गेली,
यशाच्या शिखरावर
कितीही उंच पोहोचली,
तरी बाबांच्या हृदयात
ती कायम तशीच राहतात—
हात धरून चालणारी,
मायेने जपलेली,
काळजाच्या कोपऱ्यात
अलगद ठेवलेली…
काळ बदलतो,
मुलं मोठी होतात,
पण बाबांच्या डोळ्यांत
ती कायम तशीच दिसतात—
काल हात धरून चालणारी,
आज जग जिंकण्यासाठी निघालेली,
पण बाबांच्या मनात कायम
त्यांचीच छोटीशी…
पिल्लं…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १७/०७/२०२६ वेळ: १८:४५
Post a Comment