कविता – स्वाक्षरी
लहानपणी
वहीच्या शेवटच्या पानावर
मी माझंच नाव लिहायचो.
कधी वाकडं,
कधी तिरकं,
कधी अर्धवट.
आई हसायची.
आणि म्हणायची,
"अक्षराला आकार यायला
आणि माणसाला ओळख यायला
वेळ लागतो."
तेव्हा
नाव म्हणजे
फक्त काही अक्षरं वाटायची.
मोठा झालो,
तसं आयुष्याने
अनेक कोरी पानं समोर ठेवली.
काहींवर
रेषा आधीच आखलेल्या होत्या.
काहींवर
यशाची शाई चमकत होती.
आणि एक पान
पूर्ण रिकामं होतं.
मी तेच निवडलं.
त्या दिवशी
मी रस्ता निवडला नव्हता,
तर माझ्या नावाचा अर्थ निवडला होता.
त्या दिवशी
माझ्या नावाशेजारी
संमतीची स्वाक्षरी नव्हती.
काही नजरा
माझ्या कोऱ्या पानावर
शंकेचे डाग ठेवून गेल्या.
एक रात्र अशीही होती—
उशीखाली ठेवलेलं स्वप्न
आणि डोळ्यांत जागी भीती.
खिडकीबाहेर
पहाट उभी होती,
पण माझ्या मनात
अजून अंधार होता.
तरीही
सकाळ झाली.
आणि मी
त्या कोऱ्या पानावर
पहिलं अक्षर उमटलं.
कधी
अपयशाने
माझ्या नावाखाली
एक गडद रेघ ओढली.
कधी
स्वतःवरचा विश्वास
धूसर अक्षरासारखा
वाचेनासा झाला.
तरीही
मी पान बदललं नाही.
कारण
जगाने माझ्यासाठी
अनेक स्वाक्षऱ्या केल्या,
पण माझं आयुष्य
त्या दिवशी सुरू झालं,
ज्या दिवशी
मी स्वतःच्या नावाखाली
पहिली स्वाक्षरी केली.
मागे वळून पाहताना
मला ध्येय दिसत नाही;
दिसतात
वाटेत उमटलेले
माझ्याच अक्षरांचे ठसे.
कधी ठेचकाळलेले,
कधी पुसट झालेले,
आणि कधी पुन्हा ठळक झालेले.
त्यात
प्रत्येक चुकीची शाई आहे,
प्रत्येक जखमेची नोंद आहे,
आणि प्रत्येक स्वप्नाचा अर्थ आहे.
कोऱ्या पानाची भीती नव्हती,
भीती होती—
दुसऱ्याच्या अक्षरात हरवण्याची.
आता चूक झाली,
तरी पान फाडत नाही;
तिच्याशेजारी
पुढची ओळ लिहितो.
शेवटचं पान उघडलं जाईल तेव्हा
तिथे परिपूर्ण आयुष्य नसेल.
फक्त
चुकत,
ठेचकाळत,
पुन्हा उभं राहत
जगलेल्या माणसाची
स्वतःच्या नावाखाली उमटलेली
न पुसली जाणारी
स्वाक्षरी असेल.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १०/०६/२०२६ वेळ: ०४:१४
Post a Comment