कविता – निजलास का रे?
कधी माझ्या पदराला धरून
तू घरभर पळत सुटायचास,
आणि तुझ्या त्या लहान पावलांनी
घराच्या शांत भिंतींवर
आनंद हलकेच उमटायचा…
खेळता खेळता
जेव्हा तू दमून यायचास,
तेव्हा माझ्याच कुशीत
डोळ्यांवर अलगद
झोप उतरू लागायची…
त्या मिटलेल्या पापण्यांवर
मी मायेची सावली ठेवायचे,
दुःखाचा एकही काटा
तुझ्या वाटेला येऊ नये
म्हणून
माझं संपूर्ण आयुष्य
उंबरठ्यावर ठेवून दिलं…
मी तुझ्या मऊ केसांतून
हळुवार हात फिरवत
अंगाईचे मंद स्वर
रात्रीच्या शांत हवेत
विरघळवत राहायचे…
तू झोपला की
घरभर निवांत शांतता पसरायची,
आणि तुझ्या छोट्याशा श्वासांवर
माझी रात्र
हलकेच विसावत जायची…
कधी झोपेतही
तू हसायचास,
आणि त्या निरागस हास्याने
माझ्या थकलेल्या दिवसांमध्ये
नवा उजेड फुलायचा…
नकळत दिवस सरले…
तूही मोठा होत गेलास,
पण माझ्या मनातलं
तुझं बालपण
कधीच मोठं झालं नाही.
आजही
दारावर हलकी चाहूल लागली की
क्षणभर वाटतं—
तूच आलायस
पावसाच्या गंधासारखा…
आणि नेहमीसारखा
माझ्या कुशीत शिरून
हळूच म्हणशील—
“आई…
मी आलो.”
त्या एका हाकेची ऊब
आजही
ह्या रिकाम्या घरात
मंदपणे धडधडत राहते…
आणि विचारते
निजलास का रे?
की अजूनही
माझ्या अंगाईच्या सुरांसाठी
तसाच
जागा आहेस…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०३/०६/२०२६ वेळ: १०:३५
Post a Comment