ललित लेख- ये रे घना,ये रे घना...!
माझ्या कोकणातील घराच्या वाटेवरच्या पहिल्या खुणा..वाटेत वळणावर चाफ्याचं झाड, त्याच्या आजूला आंबा, बाजूला फणस आणि पुढ्यात जांब जुना.. तसं झाडाफुलांच्या, शेताभाताच्या गंधाबरोबर हे घर अनुभवता येतं. निसर्गाच्या तालावर एखादं एखादंमनातलं गाणं सुध्दा अनावर होऊनओठावर येतं. हिरवे माड, चिवचिवणारे पक्षी, वाऱ्यावर डोलणारी मळाभर भातशेती या सगळ्यांच्याच मनात ते गीत रुंजी घालत असावं असं वाटतं. जणू सगळी सृष्टीच गातेय,ये रे घना..आरती प्रभूंचे हे गीत म्हणजे जणू आठवणींच्या रानात घुमणारी धून.!
ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल, माझ्या मना..
स्त्री च्या हळुवार नातेसंबंधांची ह्या सावळ्या पावसाळी ढगांशी वीण अगदी अचूक बांधली गेलीय हे या ये रे घना गुणगुणतांना उमगते.
डोंगरमाथ्यावर आभाळ उतरलेलं दिसलं की कालिदासाच्या विरहव्याकुळ यक्षाची आठवण होते. घाईघाईने चाललेल्या ढगांबरोबर आपली विरहव्यथा प्रियेला कळवणारा यक्ष, ही कल्पनाच केवळ महान..
तरीही बळीराजाला आपल्या हाताचा आडोसा करून आकाशाकडे पहाताना मी जेव्हा पहाते तेव्हा तो ये रे घना, ये रे घना असंच तर म्हणत नसेल ना.. अशी शंका येते. आजकाल अशी शहरी माणसं असं
घन, पाऊस पाण्यावर बोलताना दिसत नाहीत. बोलतील तरी कुठल्या तोंडाने? सगळ्या झाडापेडांची कत्तल करून नुसत्याच माणसांच्या वसाहती वाढवल्यात त्यांनी. फक्त माणसांनीच जगायचं शहरातून, बाकी कोणी नाही. पाणी
मात्र हवं यांना..
आता पाण्यासाठी कृत्रिम पाऊस
पाडला तरी आकाशातले काळे ढग काही कृत्रिम पाऊस पाडला तरी निसर्गावरच अवलंबून रहायला हवं. मनातून कितीही हद्दपार करायचं ठरवलं तरी पावसाळ्यात कधी ना कधी हे काळे ढग उभे ठाकतात आपल्या समोर.. म्हणूनच त्यांना टाळण्यापेक्षा त्यांचं स्वागत करावं.
जमलंच तर म्हणावं, ये रे घना..! आजकाल काँक्रीटच्या या जंगलातून, इमारतींच्या खिडक्यांतून डोकावणारा निळा घन,लाल मातीची कुठेच कशी गाठ पडत नाही म्हणून रूसून माघारी फिरताना दिसतो मला. त्याला असा पाठमोरा जाताना मला पाहवत नाही. आणि नकळत माझ्या ओठांवर त्या ओळी येतात. ये रे घना, ये रे घना.. माझ्या तप्त मनाला उभारी देतात. अशी या निळ्या सावळ्या पावसाळी घनांची ओढ तशी जुनीच, पण कायम मनात बसलेली..
आभाळात पावसाळी ढग दाटून यायला लागले की पक्कं समजायचं की आता झाडं नवीन होणार..मातीच्या कुशीतून असंख्य हिरवे कोंब फुटणार. सगळी सृष्टी न्हावून
निघणार.. हे ढग योग्य वेळी बरसले तर सगळीकडे समाधान पसरते. शेतकर्यांना अपेक्षित पिक मिळते. इतरांना वर्षभरासाठी दाणा पाणी वृक्षवेली, मानव, पशुपक्षी सारेच त्याच्या बरसण्याने आरोग्यसंपन्न होतात. नवचैतन्याची चाहूल देणाऱ्या या सावळ्या घनासाठी किती ओव्या आळवू असे मला होते
आणि कानामनात कायमचं बसून राहिलेलं आर्जव कामी येतं, ये रे घना...
अचानक विजांचा कडकडाट आणि सोबतीला सोसाट्याचा वारा सुरू होतो. बघता बघता पावसाची जोरदार सर कोसळायला लागते. शहरातल्या डांबरीकरणातून वाचलेल्या उरल्यासुरल्या मातीतून मृदगंध पसरायला लागतो. माझ्या बंदिस्त घराच्या खिडकीपाशी तो येतोच. या सुवासानं मात्र गात्रन् गात्र रोमांचित होतं आणि आतल्या आत प्राणांनाही मोहोर फुटतो. या पहिल्या पावसात माझ्या मनात उठतेय एक काहूर वाटते सारखी हुरहूर, गाव दूर राहिल्याची. पायाला या ओल्या मातीची आणि पहिल्या पावसाची उराउरी भेट न झाल्याची. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज मला घरातल्या घरात अस्वस्थ करतोय.
तशी "ये रे घना" ची उर्मी सगळ्यांच्याच मनात असावी..! वाऱ्याच्या साक्षीने साऱ्याच सृष्टीवर हे निळे घन पावसाचा अभिषेक करतात. तो पहातांना नेत्र सुखावतात.पहिल्या सरीबरोबरच त्या घनाचे आभार मानण्याची भावना अगदी दाटून येते. या पहिल्या पावसाच्या कोवळ्या सरी जेव्हा गळामिठी घालतात, तेव्हा वर्षभर सोसलेल्या उन्हाचे ताप आपसूकच गळून पडतात. ही धरतीच्या पोटातील संवेदना समजून घ्यायला "ये रे घना, ये रे घना" ची आर्तता तनमनात असावी लागते. अर्थात शहरातील सिमेंटच्या जंगलात याची अपेक्षा कशी करावी? खरंतर कोणत्याही वयात, कोणत्याही ठिकाणी मनावरचे निर्बंध बाजूला ठेवून अगदी निर्मळ मनाने "ये रे घना" म्हणता आले पाहिजे..
तसा लहानपणी मी कोकणात अनेक प्रकारचा वळवाचा पाऊस अनुभवलाय.एखाद्या बेखबर क्षणी अगदी बघता बघता कोसळायचा तो! मग माझी आई बरोबर अंगणातील वाळवायला घातलेली तिरफळं,काजू बिया उचलून घरात नेताना ची त्रेधातिरपीट साॅलीड असायची. त्या घनाला तेव्हा "ये रे घना" म्हणायला सुध्दा लागत नसे. लहानपणी आकाशात ढग वाजले.धडाडss धूम, वीज कडाडली कड् कड् कड् की आमची छाती दडपून
जायची. मग कुठलं म्हणायला "ये रे घना" ये रे घना".आम्ही चादर ओढून चादरीत गुडूप व्हायचो. आणि आजी म्हणायची, आभाळात म्हातारी दळण दळण दळतेय...
आजही वीज कडाडली की आभाळातली म्हातारी हमखास आठवते. इथल्या गॅलरीतून रस्यासमोरच्या वीजेच्या तारेवरची हारीने
बसलेली ओलेती निश:ब्द पाखरे बघीतली की त्यावेळच्या गावातील घरासमोरील आंब्याच्या झाडावर फांद्या फांद्यांवर पंख दडपून बसलेली पाखरंही हमखास आठवतात. आणि डोंगरमाथ्यावर ढग कळपाने चालताना दिसले की त्यावेळच्या आमच्या लहान मुलांच्या मनातील आभाळातील काळ्या म्हशी आजही डोळ्यासमोर रुंदी घालतात. शहरातील या बंदिस्त चार भिंतीमध्येही आज उकाड्याने जीवाची काहिली होतेय अशा उन्हाळी दुपारीही "ये रे घना, ये रे घना" अशी मेघांची आर्ततेने आराधना करणारी आरती प्रभूंची कविता माझ्याच प्राणांतून उमलते आहे की काय असे वाटते. असा हा काळा घन कधी कधी आला म्हणतांनाही येत नाही. नुसताच दाटून रहातो. उगाचच भूल पाडतो, आणि उकाडा आणखीच
वाढत जातो. लाही लाही करणाऱ्या उन्हाच्या झळा... तापलेल्या धरती चे तप्त श्र्वास. अशावेळी "ये रे घना, ये रे घना".. अगदी जीवाच्या आकांताने म्हटल्या शिवाय रहावत नाही..!
*ले. डॉ. स्नेहा समीर* राणे/पनवेल.
मो. 9869694075.
अभिप्राय – “ये रे घना, ये रे घना…”
डॉ. स्नेहा समीर राणे यांचा हा ललित लेख केवळ निसर्गवर्णन नसून कोकणातील मातीचा श्वास, पावसाच्या पहिल्या सरींचा गंध आणि आठवणींच्या गाभ्यातून उमललेला एक जिवंत भावसंसार आहे. “ये रे घना, ये रे घना…” ही ओळ येथे गीत म्हणून राहत नाही; ती मनाच्या अंतःकरणात रुंजी घालणारी एक आर्त, चिरपरिचित आणि जीवनाशी एकरूप झालेली साद बनते.
या लेखात निसर्ग केवळ दृश्य नाही, तर तो अनुभव आणि अस्तित्व बनून प्रकट होतो. चाफ्याचा सुगंध, आंब्याची सावली, फणसाची घनता, भातशेतीची हिरवाई आणि वाऱ्यावर डोलणारी सृष्टी—हे सर्व केवळ वर्णन न राहता वाचकाच्या संवेदनांमध्ये थेट प्रवेश करतात. लेख वाचताना पाऊस केवळ बाहेर पडत नाही, तर तो मनाच्या आत कोसळतो असे जाणवते.
लेखिकेने “ये रे घना” या गीताला केवळ काव्यपंक्ती म्हणून न पाहता त्याला एक भावनिक प्रतीक म्हणून उभे केले आहे. पाऊस येथे हवामानाचा घटक न राहता, तो स्मृती, ओढ, विरह, आणि निसर्गाशी हरवलेली नाळ यांचे प्रतीक बनतो. विशेषतः स्त्रीमनातील कोमल भावविश्व आणि निसर्गाशी असलेली सूक्ष्म, अदृश्य वीण अत्यंत नाजूकतेने आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने उलगडली आहे.
कालिदासाच्या विरहव्याकुळ यक्षापासून ते बळीराजाच्या आभाळाकडे पाहणाऱ्या नजरेपर्यंतचा संदर्भ हा केवळ अलंकार नाही, तर मानवी निसर्गसंबंधांचा कालानुक्रमिक आरसा आहे. त्यातून माणूस आणि आकाश यांच्यातील संवाद अधिक गहिरेपणाने जाणवतो.
लेखातील शहरीकरणावरील परखड भाष्य हे विशेष उल्लेखनीय आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटची जंगले आणि निसर्गापासून तुटलेली माणसाची नाळ—हे वास्तव कुठेही उपदेशात्मक न होता वेदनात्मक आणि चिंतनशील स्वरूपात व्यक्त होते. त्यामुळे हा लेख केवळ भावनिक न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारा ललित निबंध ठरतो.
बालपणीच्या आठवणी—आईची धावपळ, अंगणातील वाळवलेली फळं, आजीचे “आभाळात म्हातारी दळण दळतेय” हे रूपक, वळवाचा अचानक कोसळणारा पाऊस—या सर्व प्रतिमा केवळ स्मृती न राहता एका हरवत्या ग्रामसंस्कृतीचा जिवंत दस्तऐवज बनतात. या आठवणी वाचकाला स्वतःच्या बालपणात अलगद घेऊन जातात, ही या लेखाची मोठी ताकद आहे.
भाषाशैली अत्यंत काव्यात्म, प्रवाही आणि लयबद्ध आहे. वाक्यांची लांबी काही ठिकाणी अधिक असली तरी ती विस्कळीत होत नाही; उलट ती पावसाच्या अखंड सरींसारखी सलगपणे वाहत राहते. पुनरुक्तीतील “ये रे घना” ही ओळ प्रत्येक वेळी नव्या भावछटा घेऊन प्रकट होते आणि लेखाला संगीतात्मक लय प्राप्त करून देते.
विरामचिन्हांचा आणि वाक्यरचनेचा काही ठिकाणी अधिक काटेकोर वापर केल्यास अभिव्यक्ती अधिक शिस्तबद्ध आणि प्रभावी झाली असती. तथापि, ही तांत्रिक सुधारणा या लेखाच्या भावसंपन्नतेवर कोणताही परिणाम करत नाही.
हा ललित लेख म्हणजे निसर्गाशी केलेला आत्मसंवाद, बालपणाशी केलेली हळवी पुनर्भेट आणि शहरात हरवलेल्या गावाशी साधलेला अंतर्मनाचा शोध आहे. तो वाचताना असे वाटते की शब्द लिहिले गेलेले नाहीत—ते पावसाच्या सरींसोबत थेट मनावर कोरले गेले आहेत.
“ये रे घना…” हा केवळ लेख नसून माणसाच्या अस्तित्वाला निसर्गाशी पुन्हा जोडणारी आर्त, शाश्वत आणि सार्वकालिक प्रार्थना आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर मुंबई
दिनांक: २५/०५/२०२६ वेळ: २२:३२
Post a Comment