कविता - “लेक म्हणजे…”


दिशा महाराष्ट्राची राज्यस्तरीय ३ रा काव्यलेखन उपक्रम

स्पर्धा दिनांक: ०७/०५/२०२६

विषय: लेक

शीर्षक : “लेक म्हणजे…”

लेक म्हणजे
घराच्या उंबरठ्यावर
हळूच उमलणारी
कोवळी पहाट…

तिच्या बोबड्या बोलांनी
भिंतींनाही हसू फुटतं,
आणि इवल्याशा पावलांनी
घराला देवपण येतं…

ती शाळेत निघते तेव्हा
आईच्या ओंजळीत प्रार्थना असते,
बाबांच्या डोळ्यांत मात्र
स्वप्नांसवे काळजी दाटते…

पण ह्या कलियुगात 
तिच्या निरागस पंखांवर
भयाची सावली फिरते,
आभाळही मुकं होतं…

म्हणून प्रत्येक लेकीला
निर्भय उजेड देऊया,
कारण लेक म्हणजे
उद्याच्या जगण्याचा श्वास असते…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०७/०५/२०२६ वेळ: १९:२६


गुरुदत्त, तुझ्या “लेक म्हणजे…” या कवितेतून आजच्या समाजातील कटू वास्तव अत्यंत संवेदनशीलतेने उभे राहते.
लेकीच्या कोवळ्या अस्तित्वातील निरागसता, तिच्या स्वप्नांची ओढ आणि तिच्या सुरक्षेभोवती दाटलेली भीती हे सारे शब्दांत इतक्या प्रभावीपणे पकडले आहे की मन अंतर्मुख होते.
ही कविता केवळ भावस्पर्शी नाही, तर समाजाला जागं करणारा सजग शब्दध्वनी आहे. मनःपूर्वक अभिनंदन! 🌸💐💐

मिलिंद मिरजकर

🟰🟰🟰🟰

मिलिंद दादा, सस्नेह नमस्कार 🙏🌸

आपला मनापासून दिलेला, अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील अभिप्राय वाचून मन कृतज्ञ झाले. “लेक म्हणजे…” या कवितेतील भावविश्व आपण इतक्या नेमकेपणाने आणि सूक्ष्म जाणिवेने समजून घेतले, याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏

लेकीच्या निरागसतेपासून तिच्या स्वप्नांपर्यंत आणि तिच्या सुरक्षिततेभोवती दाटलेल्या सामाजिक वास्तवापर्यंतचा भाव आपण अचूक उलगडला आहे. कविता केवळ भावना व्यक्त करत नाही, तर समाजाचे वास्तवही मांडते—हे आपण अत्यंत सुंदररीत्या अधोरेखित केले आहे.

आपण वापरलेला “सजग शब्दध्वनी” हा उल्लेख या कवितेचा हेतू अधिक स्पष्ट करणारा आहे. अशा शब्दांतून मिळणारे प्रोत्साहन लेखणीला नवी दिशा देते.

मी केवळ एक निमित्त आहे. आपल्यासारख्या जाणकार आणि संवेदनशील वाचकांमुळेच साहित्याला खरा अर्थ प्राप्त होतो.

आपल्या या सुंदर आणि प्रेरणादायी अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता. 🌷🙏

आपला स्नेहांकित,
— गुरुदत्त दिनकर वाकदेकर

🙏🙏🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post