कविता – “ओझं”


कविता – “ओझं”

पान गळतं
तेव्हा आवाज नसतो—
फक्त एक न दिसणारी थरथर 
आणि जमिनीवर पडलेलं
न सांगितलेलं कारण…

तसंच काहीसं
आपलं नातं तुटलं—
शब्द नव्हते,
वाद नव्हते,
फक्त एक नि:शब्द सावट होतं…

कालपर्यंत
तुझ्या श्वासांत मिसळलेला
मीच होतो,
तुझ्या प्रत्येक हसण्यात
नाव न घेता उमटणारा अर्थ…

आणि आज—
त्याच नावाचं 
तुला ओझं वाटतंय,
माझं अस्तित्व
तुला नकोसं झालंय…

क्षण मात्र
तिथेच थांबलेत—
त्या विरलेल्या वळणावर,
जिथे आपण
एकमेकांतच आपलं 
जग शोधायचो…

फक्त वेळ बदलली—
ती आता
माझ्या सोबतीने चालते,
हातात हात नाही,
पण एकटेपणाची सावली धरून…

पानगळ संपते म्हणतात—
पण काही झाडं
आतूनच कोरडी होतात,
त्यांना ऋतूंचा दिलासा
कधीच मिळत नाही…

तसंच काहीसं
मनात उरलंय—
तुझं नसणं नाही,
तर
तुझ्या जगात
माझ्यासाठी
जागाच उरलेली नाही…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ३०/०४/२०२६ वेळ: ०४:३२

Post a Comment

Previous Post Next Post