कविता - अक्षरदीप : सावित्रीबाई


शब्दवेध साहित्य मंच, पुणे

आयोजित

काव्यलेखन स्पर्धा

स्पर्धा दिनांक : ११/०३/२०२६

वेळ : रात्री ८ वाजेपर्यंत

विषय : सावित्रीबाई फुले

शीर्षक : अक्षरदीप : सावित्रीबाई

काळोखाच्या काळात
अक्षरांनाही जणू
जखडून ठेवले होते—
रूढींच्या लोखंडी साखळ्यांनी.

मुलींच्या डोळ्यांत
स्वप्नांची हलकी चाहूल होती,
पण समाजाच्या दारावर
अज्ञानाचे जड कुलूप होते.

तेव्हा
एक स्त्री उभी राहिली—
हातात पुस्तक,
हृदयात धैर्य,
आणि पावलांमध्ये
परिवर्तनाचा निर्धार घेऊन.

ती होती
अक्षरदीप : सावित्रीबाई.

रस्त्यांवर उडाले दगड,
अपमानाचे वादळ उठले,
तरी तिच्या अंतःकरणातील
ज्ञानज्योत क्षणभरही विझली नाही.

जोतीरावांच्या सोबतीने
तिने उघडली शाळेची दारे,
आणि अक्षरांच्या पहिल्या किरणांनी
मुलींच्या आयुष्याला नवी पहाट दिली.

ती म्हणाली—
“शिक्षण हा हक्क आहे,
मानवतेला उजळवणारा प्रकाश आहे.”

त्या एका विचाराने
अंधाराच्या साम्राज्यावर
उगवला समतेचा तेजस्वी सूर्य.

आज प्रत्येक शाळेच्या उंबरठ्यावर
तिच्या पावलांचा इतिहास आहे,
प्रत्येक पुस्तकाच्या पानात
तिच्या संघर्षाचा सुवास आहे.

म्हणूनच
ज्ञानाच्या प्रत्येक अक्षराला
आजही एकच तेजस्वी नाव—
सावित्रीबाई फुले,
स्त्रीशिक्षणाची क्रांतीज्योत
आणि समतेच्या नवयुगाची पहाट.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०३/२०२६ वेळ : १९:४४

Post a Comment

Previous Post Next Post