कविता - बाबाच पास झाला
आजची पहाट
नेहमीसारखी उगवली होती,
तरीही ओसरीवरच्या
प्रत्येक किरणात
मनाची धडधड दडली होती.
दरवाज्यात उभी होती माझी लेक—
डोळ्यांत प्रश्नांचे आकाश,
हातात मोबाईल,
ओठांवर थांबलेले शब्द.
निकाल जाहीर झाला.
क्षणभर
वेळेने श्वास रोखला,
घरभर पसरली शांतता—
देवळातील आरतीपूर्वीचा
तो गंभीर, पवित्र क्षण.
तिने अलगद माझ्याकडे पाहिलं
आणि हळूच म्हणाली—
“बाबा… मी पास झाले.”
त्या एका वाक्यात
माझ्या आयुष्याचा सारा प्रवास
अचानक उजळला.
पावसात भिजलेले दिवस,
जागलेल्या रात्री,
तिच्या शिक्षणासाठी
न बोलता केलेले त्याग—
सगळे एका क्षणात
फुलांसारखे उमलले.
दप्तरात पुस्तकं ठेवताना,
तिच्या वहीच्या कोऱ्या पानांवर
उमटली होती
माझ्या स्वप्नांची अक्षरं.
पण आज ती उभी होती
स्वतःच्या कर्तृत्वाच्या उजेडात—
डोळ्यांत नव्या क्षितिजांची झेप,
पावलांत आत्मविश्वासाचा नवा मार्ग.
आणि माझ्या अंतःकरणात
एक शांत,
समाधानाचा प्रकाशोत्सव.
त्या क्षणी मला उमगलं—
परीक्षा फक्त तिची नव्हती;
ती होती विश्वासाची,
संस्कारांची,
आणि आशेच्या अखंड प्रवासाची.
तिच्या यशाच्या फुलांमध्ये
माझ्या घामाचा सुगंध होता,
तिच्या हास्यात घरभर पसरलेली
माणुसकीची उब होती.
मी तिच्याकडे पाहून
हलकेच हसलो आणि म्हणालो—
“पिल्ला, तुझा निकाल लागला…
पण खरं सांगू?
आज बाबाच पास झाला.”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०३/२०२६ वेळ : ०७:२०
Post a Comment