कविता – मराठी रंगभूमीला अभिवादन


कविता – मराठी रंगभूमीला अभिवादन

रंगमंचावर दिवे उजळतात,
'आनंदडोह' भरून वाहतो,
कारण आज ’मराठी रंगभूमी दिन’ —
जिथे भावना, विचार आणि आत्मा एकत्र नटतात.

कधी 'नटसम्राट' बनून ती समाजाच्या हृदयाला हात घालते,
कधी 'सखाराम बाईंडर' होऊन वास्तव दाखवते,
कधी 'घाशीराम कोतवाल' होऊन सत्तेच्या अंधाराला भेदते,
तर 'शांतता! कोर्ट चालू आहे' म्हणत अंतरंगाचे न्यायालय उभे करते.

त्या मंचावर 'आई रिटायर होतेय' मुळे डोळ्यांत पाणी दाटते,
'अश्रूंची झाली फुले' म्हणावीत अशी कोमलता निर्माण होते.
कधी ’तो मी नव्हेच' म्हणत ओळखींची व्याख्या बदलते,
कधी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' म्हणत इतिहासाला आरसा दाखवते.

रंगभूमी — तू 'कुसुम मनोहर लेले' सारखी नाजूक,
आणि 'वणवा – एक क्रांती' सारखी धगधगणारी.
कधी 'लग्न नावाची गोष्ट' बनून हास्य फुलवतेस,
तर कधी 'किरवंत' होऊन अंतर्मनातील वेदना जागवतेस.

'देव दीनाघरी धावला' म्हणावी अशी करुणा,
'संगीत मानापमान', 'संगीत सौभद्र', 'संगीत मृच्छकटिकम्' –
या तुझ्या स्वरांची सुरावट अजूनही गुंजते,
जिथे प्रत्येक सूर समाजाच्या जखमांवर फुंकर घालतो.

कधी 'गाढवाचं लग्न' हास्याच्या धबधब्यात भिजवतो,
तर कधी 'वल्लभपूरची दंतकथा' आपल्याला स्वप्न दाखवते.
कधी 'हमिदाबाईची कोठी'
जिथला प्रकाश अंधारावर विजय मिळवतो.

'कोण म्हणतो टक्का दिला?'
तूच खरी जनता, जनार्दन, जनसंवेदना.
तुझ्या रंगांमध्ये 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'
सारखा स्वाभिमान, न्याय आणि जागृतीचा गजर असतो.

रंगभूमी,
तूच आमचा 'प्रीतिसंगम',
तूच 'आनंदी गोपाळ',
म्हणूनच आमच्या अंतःकरणातील 'वाहतो ही दुर्वांची जुडी'.

तू आम्हाला शिकवतेस —
हसतं हसतं रडणं,
रडतं रडतं जगणं,
आणि जगतांना जग बदलणं!

आज या प्रकाशवृत्ताच्या मध्यभागी
तुला वंदन —
हे नाट्यदेवते,
तूच आमची संस्कृती, संवेदना आणि सत्याचं प्रतीक.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०५/११/२०२५ वेळ : १८:०९

Post a Comment

Previous Post Next Post