कविता – येळकोट
झुंजूमुंजू होताना...
डोंगररांगा जाग्या होतात,
आणि दरी–खोऱ्यात दुमदुमतो स्वर —
“येळकोट… येळकोट… जय मल्हार!”
वार्याच्या झुळकीसोबत,
मातीचा सुगंध नाकाशी भिडतो —
तोच परिमळ…
जो भिजलेला असतो,
भावभक्तीच्या घामाने...
घोडदळांच्या टापांतून उमटतो इतिहास,
धुळीत मिसळलेल्या त्या रणधुरंधर स्मृती —
जणू प्रत्येक कणात मल्हाराची पाऊलखूण,
आणि प्रत्येक श्वासात जागी भक्ती...
गाभाऱ्यात तेलवातींची सोनेरी ज्योत,
श्रद्धेच्या नाजूक कंपनांनी झुळझुळते...
भक्त हात जोडतात,
डोळे मिटतात,
मन मात्र उघडं ठेवतात —
त्या दैवी तेजासमोर...
“येळकोट” उच्चारताच —
जिभेवर विराजतो विश्वासाचा गोडवा;
प्रत्येक अक्षरात लपलेलं असतं समाधान,
जणू मल्हाराच्या कृपेचं कुंकवाचं ठिपकं कपाळावर!
भक्त तृप्त होतात केवळ दर्शनानेच नाही,
तर त्या मातीच्या श्वासाने —
जिथे देव आणि माणूस
एकाच शेतातलं पीक होतात...
डोंगरावरून वाहणाऱ्या धारा
घुमतात त्या नामजपात —
जणू निसर्गही म्हणतो —
“येळकोट येळकोट जय मल्हार!”
या जयघोषात आहे इतिहासाची गर्जना,
अश्रू आहेत अनुभवांचे,
आणि शांती आहे आत्मबोधाची...
“येळकोट” म्हणजे केवळ घोष नव्हे —
ती आहे भक्तीची अखंड लय,
मनाच्या रणभूमीतलं विश्वासाचं कवच,
आणि जीवनाच्या थकव्यावरचा ओंजळभर गंध...
जेव्हा मन थकून जातं,
तेव्हा अंतःकरणही कुजबुजतं —
“येळकोट बापा, जय मल्हार!”
आणि त्या एका हाकेतच...
आयुष्य पुन्हा उजळून निघतं…
तेलवात पुन्हा तेजाळते,
भक्ती पुन्हा नव्याने जागते!
“येळकोट” — म्हणजे,
विश्वासाच्या भट्टीतून घडलेलं सोनं…
जे मनात मुरलं की —
जगणंही प्रसादासारखं… गोड होतं…
“जय मल्हार!”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०७/११/२०२५ वेळ : ०७:४७
Post a Comment