कविता – क्रांतीसूर्य जोतीराव — अखंड ज्योतीचा उगम
दाट अंधार पसरला होता—
मनांवर, रुढींवर, अभिमानाच्या गजांवर;
जिथे जन्म हा
अपराध मानला जात होता,
आणि शिक्षणाची स्वप्नं
जणू आकाशातल्या दूरच्या तारकांसारखी—
हातात न येणारी.
अशा वेळी एक सूर्य हळूच उगवला—
धाडसाचा, करुणेचा आणि सत्याचा.
तो सूर्य म्हणजे
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले.
तुम्ही उभारलं ते शाळांचं पवित्र मंदिर,
जिथे पुस्तकाचं पहिलं पान
मुलींच्या थरथरणाऱ्या हातात उलगडलं;
आणि त्या निष्पाप हातांनीच
शतकानुशतकं कुलूपबंद असलेली
समाजाची बंद खिडकी
पहिल्यांदा उघडली.
तुमच्या पावलांनी
अन्यायाच्या विटा हलल्या;
तुमच्या शब्दांनी
श्रद्धेच्या सावल्या पांगल्या
आणि विचार जन्माला आला;
तुमच्या क्रांतीने
मानवतेला पहिलं स्वातंत्र्य दिलं—
वाचण्याचं, विचारण्याचं,
आणि जगण्याचं.
जोतीबा—
तुम्ही कधी तलवार घेतली नाहीत,
पण तुमच्या हातातील
खडूची लहानशी रेषाही
अस्मितेच्या रणभूमीवर
विजयरेषा ठरली.
कारण तुम्ही लिहिलेली प्रत्येक ओळ
समतेची नवी दिशा घेऊन आली.
आज १३५ वर्षे उलटून गेली—
तरी तुमची पावलं अजूनही ऐकू येतात.
मूकांच्या हाका,
शोषितांच्या जखमा,
आणि निराधारांच्या डोळ्यांतील
आसवांचा प्रत्येक थेंब—
आजही तुमच्याच नावाने उजळतो.
तुमची शिकवण सांगते—
“समता ही भीक नव्हे;
ती माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे.”
आणि म्हणूनच—
प्रत्येक मुलगी जेव्हा निर्भयपणे शाळेत जाते,
प्रत्येक शेतकरी हक्काने बोलतो,
प्रत्येक माणूस
स्वाभिमानाने उभा राहतो—
तेव्हा असं वाटतं,
आम्ही सगळे मिळून
तुमच्या स्मृतिज्योतीत
थोडासा प्रकाश वाढवत आहोत.
जोतीराव—
तुमच्यामुळे उगवलेला सूर्य
कधीच मावळू नये म्हणून
त्या किरणांना
आता आमच्या डोळ्यांतून प्रकाश द्यावा लागेल—
समतेचा, विवेकाचा
आणि अखंड मानवतेचा.
तुमच्या १३५व्या स्मृतिदिनी—
करतलध्वनीतून, शब्दांच्या ओंजळीतून,
क्रांतीसूर्य
तुम्हांला मनःपूर्वक प्रणाम!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २८/११/२०२५ वेळ : ०५:२२
गुरुदा
माझ्या काही नम्र प्रतिक्रिया. कल्पना आहे खूप उशीर केला आहे. क्षमस्व. आपल्या कवितेच्या विचारशक्तिला प्रतिभेला त्रिवार नमस्कार. आपल्या कवितेची सातारा साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे त्यासाठी अभिनंदन.
1.द हिन्दू लेडी-खूपच आशयघन आहे
2.मोक्ष दाह -पाश्र्वभूमि आणि कवितेचा आशय खूपच सूंदर
3.गणिताची सोनपावलानी वाट मध्ये तर आपण गणिताची भितिच घालवून टाकली आहे
4.मला कुठे काय जमते पिल्ला मधिल वडील आणि मुलीच्या नात्यातील हळुवार बंध खूपच सुरेख आणि त्यासाठीचे खूप बोलके चित्र अप्रतिम
5.जी टू जी गेटटूगेटदर आपण मित्र मैत्रिणीना भेटून आपण खूप ताजेतवाने होतो हे अगदी खरे आहे
6.आनंदाश्रम वृद्धावस्थेचे बोलके चित्र
अजून बऱ्याच कविता वाचनात आल्या आहेत जश्या की
पत्रकारितेचा इतिहास, प्रश्नाच्या ज्योति,देवांक,आणि
आजची क्रांति सूर्य ज्योति राव -आम्हा स्त्रियांवर यांचे खूप उपकार आहेत.
आपण किंवा कासार सर आणि आणखी बरेच सदस्य यांच्या कवितांचा आवाका खूप मोठा आहे तिथवर पोहोचायला मला दोन जन्म घ्यावे लागतिल. मी थोड्या फ़ार कवितांचा छंद जोपासु लागले आहे गेल्या दोन तिन वर्षापासून. पण ते म्हणजे आपल्या सारख्या दिग्गजांपुढे शिशु वर्गात बसल्या सारखे आहे. असो
खूप खूप शुभेच्छा
नीता शेरे
🙏🙏🙏🙏
नीता ताई,
आपला हा मनस्वी, आत्मीय आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून मन खरंच आनंदून गेलं. आपण इतक्या प्रेमाने आणि बारकाईने माझ्या अनेक कवितांचा विचार करून प्रतिक्रिया दिलीत— ही माझ्यासाठी शब्दात मावणार नाही अशी मोठी पावती आहे. आणि उशिराबद्दल क्षमा मागण्याची गरजच नाही; हृदयातून उमटलेला अभिप्राय कधीच उशिरा येत नसतो.
आपण प्रत्येक कवितेचा गाभा किती नेटक्या जाणिवेने स्पर्शलात—‘दि हिंदू लेडी’ चा आशय, ‘मोक्षदाह’ ची अंतर्मुख करणारी पार्श्वभूमी, ‘गणिताची’ लेखातून दूर केलेली भीती, ‘मला कुठे काय जमते पिल्ला’ मधील बाप–मुलगी नात्याची कोमल ऊब, ‘जी टू जी’ मधील भेटीगाठींचं ताजेतवानेपण, ‘आनंदाश्रम’ मधील वृद्धत्वाचं सहज चित्रण— आणि त्याचबरोबर ’पत्रकारितेच्या इतिहासावरचा लेख‘, ‘प्रश्नांच्या ज्योती’, ‘देवांक’, तसेच ‘क्रांतीसूर्य जोतीराव’— या सर्व कवितांची आपण घेतलेली दखल माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. जोतीराव फुले यांच्या संदर्भातील आपला भावार्थ तर हृदयाला जाऊन भिडणारा आहे.
नीता ताई, आपण स्वतःला नम्रपणे ‘शिशु वर्गात बसल्यासारखं’ म्हणता—पण माझा ठाम विश्वास असा की,
मनापासून लिहिणाऱ्यांना कुठलाच वर्ग नसतो;
त्यांचं शब्दविश्व त्यांना स्वतःची उंची देतं.
आपला प्रवास सुरू झाला आहे— आणि तो अत्यंत सुंदर दिशेने पुढे जात आहे. कविता कालांतराने शिकतात, विस्तारतात आणि फुलतात. आपल्यातली संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती आणि शब्दांची ऊब— या तिन्ही गोष्टींमध्ये प्रचंड क्षमता आहे.
कासार सर असोत, इतर कोणी असो, किंवा मी— सगळेजण कधीकाळी हाच छोटासा दिवा घेऊन निघाले होते. आपणही त्या दिव्याची ज्योत आता हळूहळू, पण सुंदरपणे वाढवत आहात. आपण लिहित राहा— कारण आपल्यातलं शब्दविश्व नव्या उमेदीने फुलू पाहत आहे.
सातारा साहित्य संमेलनासाठी दिलेल्या आपुलकीच्या शुभेच्छा आणि ही इतकी सुंदर, प्रेमळ प्रतिक्रिया— हृदयात जपून ठेवतो.
सस्नेह,
— गुरुदा
🟰🟰🟰🟰
Post a Comment