लेख – संध्या व्ही. शांताराम– रुपेरी पडद्यावरच्या नृत्य, अभिनय आणि सौंदर्याचा त्रिवेणी संगम


लेख – संध्या व्ही. शांताराम– रुपेरी पडद्यावरच्या नृत्य, अभिनय आणि सौंदर्याचा त्रिवेणी संगम

‘संध्या व्ही. शांताराम गेल्या’ ही बातमी कानावर पडताच मनात एक वेगळंच ओझं दाटून आलं. त्यांनी साकारलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांतील असंख्य भूमिका डोळ्यासमोर तरळू लागल्या. अभिनयातील त्यांची एक खास जादू होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली आणि त्या विशेषतः त्यांच्या नृत्यामुळे अजरामर झाल्या. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील हावभाव, मुखमुद्रा, आणि अभिव्यक्ती इतकी भावपूर्ण होती की ती दृश्यं आजही रसिकांच्या मनात कोरलेली आहेत. “झनक झनक पायल बाजे” मधील त्यांच्या नृत्याच्या लयीतून आणि “पिंजरा”तील तीव्र अभिनयातून त्यांनी स्वतःची ओळख एक नर्तकी आणि एक भावनासंपन्न अभिनेत्री म्हणून कायमस्वरूपी निर्माण केली.

संध्या यांचे मूळ नाव विजया देशमुख. त्यांची मोठी बहिण वत्सला देशमुख यांच्या प्रेरणेने त्या चित्रपटसृष्टीत आल्या. कलाक्षेत्राचा वारसा नव्हता, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि मेहनतीचा संगम होता. बॅकस्टेजचं काम करणाऱ्या रंगमंच-कर्मचार्‍याची ती मुलगी; रंगमंचावर छोट्या भूमिका करून सुरुवात करणारी विजया देशमुख नियतीच्या नियोजनानुसार लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार होती. व्ही. शांताराम हे ‘अमर भूपाळी’ या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. वत्सला यांनी बहिणीला ऑडिशनला पाठवलं. विजया यांच्या स्क्रीन टेस्टनंतर शांताराम थोडे साशंक झाले; पण त्यांच्या हावभावांमध्ये आणि आवाजात त्यांनी एक सच्चेपणा पाहिला. चेहऱ्यावरील साधेपणात त्यांना अस्सल सौंदर्य दिसलं. अखेर त्यांनी तिचं नाव ‘संध्या’ असं ठेवलं, आणि १९५१ साली प्रदर्शित झालेल्या “अमर भूपाळी” ने संध्या यांचा रजतपटावरचा सुवर्ण प्रवास सुरू झाला.

१९५२ मध्ये “परछाई” प्रदर्शित झाला आणि संध्या व व्ही. शांताराम यांचं प्रेम फुलू लागलं. १९५६ मध्ये त्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या कलायात्रेने नवा आयाम गाठला. शांताराम यांच्या दिग्दर्शनात संध्या यांचा अभिनय नवनवीन रंगांनी खुलला. “झनक झनक पायल बाजे” हा त्यांचा कलात्मक मैलाचा दगड ठरला. नृत्य शिकण्यासाठी संध्या यांनी प्रख्यात नृत्यदिग्दर्शक गोपीकृष्ण यांच्याकडून अठरा अठरा तास तालीम घेतली. मेहनतीच्या घामातून झळकलेले हे नृत्य भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर ठरले. त्या चित्रपटाने चार फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर “दो आँखें बारह हाथ” (१९५७) मध्ये चंपा या भूमिकेत त्या झळकल्या. त्याच चित्रपटातील “ऐ मालिक तेरे बंदे हम” हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर आहे.

संध्या आणि शांताराम यांचा “नवरंग” (१९५९) हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासात कलात्मक उत्कटतेचं प्रतीक ठरला. ऑपरेशननंतर संध्या यांनी फुलांनी सजवलेली खोली पाहताच शांताराम यांनी आपल्या पुढील चित्रपटाचे नाव ‘नवरंग’ असं घोषित केलं. यानंतर त्यांच्या नात्यातील कलात्मक जवळीक अधिक दृढ झाली आणि भारतीय सिनेमात अभूतपूर्व कलात्मकता साकारली. संध्या यांनी या चित्रपटात साकारलेल्या शकुंतलेच्या भूमिकेत स्त्रीत्वाचं शास्त्रीय आणि भावनात्मक रूप खुललं. “आया होली का त्योहार” आणि “नैन सो नैन नाहीं मिलाओ” या गाण्यांमधील त्यांचा नृत्याविष्कार आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. नंतरच्या काळात “सेहरा” (१९६३), “स्त्री” (१९६१) आणि “जल बिन मछली, नृत्य बिन बिजली” (१९७१) सारख्या चित्रपटांमधून त्यांनी नवनव्या व्यक्तिरेखा साकारल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत “पिंजरा” (१९७२) हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट ठरला. डॉ. श्रीराम लागू यांच्यासमवेत साकारलेल्या त्या भूमिकेत त्यांनी तमाशा कलावंताच्या माध्यमातून स्त्रीच्या अस्तित्वाचा, समाजातील अन्यायाचा आणि स्वाभिमानाच्या संघर्षाचा विलक्षण संगम साकारला. “मला लागली कुणाची उचकी” हे गीत आणि त्यातील संध्या यांचा अभिनय आजही मराठी सिनेप्रेमींसाठी अविस्मरणीय आहे. “पिंजरा”साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर “चंदनाची चोळी अंग अंग जाळी” या चित्रपटानेही त्यांच्या अभिनयाची छाप अधिक दृढ केली.

संध्या यांचा कलात्मक प्रवास १९५१ ते १९७५ या कालखंडात झळकत राहिला. “अमर भूपाळी”, “तीन बत्ती चार रास्ता”, “झनक झनक पायल बाजे”, “दो आँखे बारह हाथ”, “नवरंग”, “सेहरा”, “स्त्री”, “लड़की सह्याद्री की”, “जल बिन मछली नृत्य बिन बिजली”, “पिंजरा” आणि “चंदनाची चोळी अंग अंग जाळी” हे त्यांचे गाजलेले चित्रपट भारतीय चित्रसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत.

भारतीय रुपेरी पडद्यावर नृत्य, अभिनय आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या या तेजस्विनी मूर्तीने कला, संस्कार आणि सौंदर्य यांचे अप्रतिम नाते प्रस्थापित केले. त्यांनी अभिनयाला अध्यात्माची छटा आणि नृत्याला आत्म्याची लय दिली. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणींचा “नवरंग” आजही आपल्या मनात फुलतो, आणि त्या फुलांचा सुगंध म्हणजेच संध्या यांच्या कलेची अमर गंधवार्ता आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०५/१०/२०२५ वेळ : ०३:२४

Post a Comment

Previous Post Next Post