कविता - देव माझ्या घरट्यात

स्पर्धेसाठी

शब्दसेतू साहित्य मंच, पुणे
आणि
मोरणा कवीकट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्यलेखन स्पर्धा २०२५

फेरी क्रमांक : २

विषय : मायबाप

शीर्षक : देव माझ्या घरट्यात

आई मायेचा उगम,
बाप धीराचा आधार,
त्यांच्या प्रेमात दडले,
जग अवघे स्वीकार.

ज्यांच्या श्रमाने फुलले,
रानी सौंदर्य अपार,
नित्य वंदावे चरण,
तेच जीवनाचे सार.

त्यांच्या सौम्य छायेखाली,
त्यांची प्रतिमाच झालो,
त्यांच्या मन मंदिरात,
एक माणूस घडलो.

घासामध्ये लपलेला,
त्यांच्या स्नेहाचा प्रसाद,
साद घालता मायेने,
होई देवाजीचा नाद.

ओझं विषारी दुःखांचं,
तरी तोंड मिटलेलं,
आत सारं दडवून,
स्वप्न नवं दाखवलं.

त्यागधर्म बिंबवले,
जगताना घडवले,
संकटांशी झुंजताना,
भाग्यद्वार उघडले.

आज आईवडीलांचा,
नसे कोठेही आभास,
स्मृती गंधात जपला,
त्यांच्या स्पर्शाचा सुवास.

असे मायबाप माझे,
कशा जाऊ राऊळात,
कष्टप्रिय, शांतमूर्ती,
देव माझ्या घरट्यात.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०५/२०२५ वेळ : १३:५०

Post a Comment

Previous Post Next Post