कविता - शांततेच्या छायेत
नाही उरली आता घाई,
ना कसलीच धावपळ...
फुलांची कळी न उमलताच कळते –
गंध टिकतो, रंग विरतो.
शब्दांपलीकडचं काहीतरी
मनात संथ उगवतं –
जणू दवबिंदूंच्या निःशब्द वलयात
आभाळ हलकेच उतरून येतं.
राग रुसवे, अपेक्षांचे हिशेब
सगळे थांबलेत आता –
माफ करणंही सहज झालंय,
आणि विसरणंही!
स्मृतींच्या माळा सैलावल्या,
नि साखळ्या आपोआप गळून पडल्या.
नात्यांचा भार हलका झाला –
जेव्हा मी केवळ 'एक' आहे,
हे अंतरंगात उमटलं.
घरातली ओळखीची भिंतही
आता नव्या प्रतिमांनी सजते,
आणि जुन्या सवयी
क्षणांच्या धूसर पडद्याआड हरवतात.
मी उभा आहे
मधल्या वळणावर –
ना पारंपरिक, ना आधुनिक –
फक्त…
सावलीच्या निःशब्द सान्निध्यात स्थिरावलेला.
काही निसटलेलं नाही
आणि मिळवलेलंही नाही –
हे जे आहे,
तेच तर संपूर्ण आहे!
शब्द थांबतात,
आठवणी विरतात,
आणि उरतो केवळ
स्वतःच्या अस्तित्वाचा
नितळ शांत प्रकाश.
ना वाट पाहायची,
ना मागे वळायचं –
या तटस्थ निवांततेत
स्वतःला संपूर्णत्वानं सामावून घ्यायचं –
जणू संध्याकाळच्या समुद्रात
आपलीच सावली हात धरते...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०६/२०२५ वेळ : १०:४४
Post a Comment