कविता - घर... मनासारखं


कविता - घर... मनासारखं

घर असावं घरासारखं — नकोत नुसत्या भिंती,
जिथे नात्यांना लाभावी स्पर्शाची ओल,
जिथे शब्दांशिवायही उमटावा संवाद,
शांततेतही ऐकू यावा हृदयाचा ठोका.

भिंती असाव्यात — आठवणींच्या छायाचित्रांनी सजलेल्या,
दारं असावीत — नेहमी स्वागतासाठी खुली,
खिडक्या उघडाव्यात नव्या स्वप्नांना वाट देण्यासाठी,
आणि छत —
ज्याखाली विसावतात रुसवे, फुगवे,
आणि काळजाचे सुवर्णक्षण.

घर असावं —
उन्हात सावली देणारं झाड,
आईच्या पावलांचा शांत करणारा नाद,
वडिलांच्या खांद्यावर विसावलेला थकवा.

घर असावं घरासारखं —
प्रत्येक कोपऱ्यात साठवलेली गोष्ट,
स्वयंपाकघरात दरवळणारा
आजीच्या भाकरीचा साजूक गंध,
आणि देवघरात उजळणारा
तोच जुना विश्वास — लख्ख दिव्यासारखा.

नकोत नुसत्या भिंती —
ज्यात नसतो श्वास, नसते साद,
फक्त निस्तब्ध पडदे,
जे नात्यांबरोबर कधीच डुलत नाहीत.

घर असावं —
जिथे श्वास घेताना वाटावं, "इथे मी पूर्ण आहे!"
जिथे क्षण थांबावा, काळ गोठावा,
प्रेम गोधडीसारखं कवटाळावं.

घर असावं घरासारखं —
फक्त भिंती असून भागत नाही,
हवे असतात आठवणींचे श्वास,
ऊबदार स्पंदनं, नात्यांचे पदर.

घर असावं —
सागराच्या लाटेसारखं —
सतत हलणारं, उबदार,
आपल्यात सामावून घेणारं...
घर... मनासारखं.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०४/०५/२०२५ वेळ : २१:०६

Post a Comment

Previous Post Next Post