कविता - गुणांचा गंध
महालातही अश्रू वाहतात
आणि झोपडीतही
हसरे स्वप्न उगम पावतात,
नशिबाची उष्ण सावली
श्वासांत उतरली,
की अंधारही झगमगतो
एका मिणमिणत्या दिव्यासारखा...
फुलाला रंग असतो,
मात्र ओळख होते
त्याच्या सुवासाने —
तसंच माणूसही मोठा वाटतो
त्याच्या नावाने नाही,
तर त्याच्या कृतीतून उमटलेल्या
गुणांच्या गंधाने...
पाठीमागे कुजबुजणारे असतातच,
सावल्यांसारखे —
पण त्यांचं अस्तित्व
फक्त प्रकाशातूनच जाणवतं
सावली कधीच उजेडाशी
सामना करू शकत नाही...
शांत राहणं म्हणजे
कधी कधी आकाशासारखं असतं —
सगळं पचवतं,
सगळ्याला सामोरं जातं
तरीही नि:शब्द असतं...
आणि म्हणूनच
माझ्या साधेपणाचं तेज
थेट भिंती पार करतं,
माझ्या झोपडीतील हसू
राजवाड्याला हरवून टाकतं...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०५/०५/२०२५ वेळ : ०४:४५
Post a Comment