माझे संपादक मित्र संदीप महाजन यांच्या मुलीचा वैष्णवी हिचा अाणि जावईबापू अनंत यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस ३ मे २०२५. त्यानिमित्ताने सुचलेली कविता.
कविता - सुवर्णक्षणांच्या गंधमाळा
(एका बापाच्या काळजातून)
आजचा दिवस खास उजाडला आहे,
कारण याच दिवशी
माझ्या लेकीच्या आयुष्यात
प्रेम, विश्वास आणि सहवासाची
पहिली पहाट उमलली होती…
तिनं अंगण ओलांडलं,
तेव्हा तिला हसताना पाहिलं
आणि माझ्या डोळ्यांतली धूसर नजर
ओलसर सावली बनून स्थिरावली…
क्षणभर काळजावर
विरहाचा पाऊस रिमझिमला,
पण तिच्या पावलांखाली
स्वप्नांची नवी वाट उमलताना दिसली…
ती निघाली,
पण मागे ठेवून गेली
एक संपूर्ण आकाश माझ्या आठवणींना,
ज्यात तिच्या हसण्याचं चांदणं
आजही मंदसं उजळतं…
तेव्हाच तू –
माझा जावई नव्हे,
तर तिचा सखा, आधार, विश्वास
माझ्या आश्वासक नजरेत
निसटता सूर झाला होतास…
तुझ्या हातात तिचा हात,
तिच्या डोळ्यांत तुझं प्रतिबिंब
आणि माझ्या काळजाच्या कोंदणात
शांततेचा उबदार स्पर्श विराजमान झाला…
आज एक वर्ष सरलं –
तुमच्या सहजीवनाच्या हळुवार रेषा
सुवर्णक्षणांच्या गंधमाळा बनून दरवळल्या…
माझी लेक,
माझा जीव की प्राण,
तुझ्या प्रेमात खुलतेय, नांदतेय, फुलतेय…
हे नातं असंच बहरत जावो,
सुख, समाधान आणि अढळ विश्वासानं
तुमचं आयुष्य सतत पवित्र होत राहो…
माझ्या आशीर्वादांच्या सावलीत
तुमच्या संसाराची दीपमाळ उजळत राहो…
या सहजीवनाच्या सजणाऱ्या रांगोळीत
प्रेमाचे रंग असेच दररोज खुलत राहोत…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०३/०५/२०२५ वेळ : २३:०४
Post a Comment