कविता - अंतर्मनाची कागदी नौका
कधीतरी,
एक नाजूकशी कागदाची नौका
गर्विष्ठ समुद्राला सहज विचारते —
"तू इतका अथांग असूनही,
माझ्या स्पर्शाने अस्वस्थ का होतोस?"
गर्व म्हणजे —
स्वतःच्या सामर्थ्यावरचा अंधविश्वास,
जो दुसऱ्याचं अस्तित्वच नाकारतो.
पण क्षुल्लक वाटणारी गोष्टही,
कधी कधी आरसा ठरते
आत खोलवर पाहायला लावते.
संकटांचं पाणी
चारही बाजूंनी उसळत असतं,
पण जहाज तेव्हाच बुडतं,
जेव्हा ते पाणी
त्याच्या अात शिरतं.
आपलं मनही असंच एक जहाज —
बाहेरील टोचणारे शब्द,
द्वेषाचे वार,
अहंकाराचे वादळ
हे सगळं केवळ बाहेरच राहू द्या.
एकदा का ही नकारात्मक ऊर्जा
अंतर्मनात रूजली,
की जीवननौका
दिशाहीन होते, भरकटते.
म्हणून
जगाच्या गोंगाटातही
अंतरंगात शांती राखणे
हेच खरं आत्मभान
समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात
विचारांचा एक दीप तेवत ठेवावा —
करुणा, सहनशीलता, विवेक
आणि आशेचा तो न विझणारा दीप...
राजकारणाचा गोंधळ,
जात-पात, विकृत मूल्यव्यवस्था...
हे सगळं
मनाच्या उंबरठ्यावरच थांबवा.
आणि आत ठेवा
एक निर्मळ, विशाल अंतर्मन,
जिथे आरूढ असेल
एक जिद्दी, लाघवी कागदी नौका —
जी तुमचं "स्वत्व" घेऊन
शांततेच्या किनाऱ्यावर
शांतपणे पोहोचेल...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/०५/२०२५ वेळ : ११:२५
Post a Comment