कविता - सावरकर - एक स्वातंत्र्यसूर्य
(स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त)
अनादी मी... अनंत मी... असणार्या
तात्या तुमचं अस्तित्व काळाच्या
भिंती भेदून झळकत राहिलं,
कारागृहाच्या काळोख्या भिंतींतून
तुमच्या विचारांचा सूर्य उगवत राहिला!
तुमच्या लेखणीच्या टोकावरून
अश्रू ओघळले नव्हते —
तेच होते राष्ट्रनिर्माणाचं तेजस्वरूप!
‘खोटं स्वराज्य’ नव्हे,
तुम्ही रचला होता
रक्ताने रेखलेला पूर्ण स्वातंत्र्याचा मार्ग!
अंदमानच्या त्या काळकोठडीत
लोखंडी साखळ्यांनी शरीर झिजवलं —
पण आत्मा?
तो तर विचारव्यूहात भटकणारा अर्जुन होता,
ज्याच्या रथावर धर्म आणि विज्ञान
दोघेही सारथ्य करत होते.
तुम्ही केवळ इतिहासच नव्हे —
भविष्यकाळ आहात!
रणभूमीवरील रणगर्जित वादळ,
वज्रासम लेखणी
आणि शब्दांचे बाण झालात...
शब्दांच्याच स्फुल्लिंगातून
क्रांतीचं तेज पेटतं,
विचारांच्या वीटांतून
उभं राहतं स्वराज्याचं मंदीर!
तुमच्या रक्तात निनादत होती
शिवबाच्या पदस्पर्शाची साद,
आणि त्या स्फोटक ओळी
"ने मजसी ने परत मातृभूमीला..."
तीच तुमच्या प्रत्येक श्वासाची आर्तता होती!
स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वराज्य —
या त्रिवेणीमध्येच
तुमचं हिंदुत्व तेज भरत राहिलं.
तुम्ही प्रखर राष्ट्रभक्त,
तत्त्ववेत्ता, धैर्याचं मूर्तिमंत रूप,
कारण तुम्ही सावरकर आहात!
तुमच्या नावाच्या पुढे
‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी नाही —
ती माझ्या प्रत्येक श्वासाची घोषणा आहे,
ती माझ्या नसानसांत धगधगणारी ज्वाळा आहे!
आज साजरी होत आहे तुमची जयंती —
ही केवळ आठवण नव्हे,
ही एक चैतन्यज्योत आहे,
ज्याचा धगधगता ज्वाळेचा स्पर्श
तरुण मनांमध्ये क्रांतीची ठिणगीच पेटवतो!
आणि म्हणून तात्या,
आपल्या चरणांशी नतमस्तक होत,
हा कविता-सन्मान मी अर्पण करतो,
एक शब्द-दीप प्रज्वलीत करतो —
माझ्या लेखणीतून
एक स्वातंत्र्यसूर्य जपतो आहे.
जय सावरकर!
जय हिंद!! 🇮🇳
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २८/०५/२०२५ वेळ : ०७:४७
Post a Comment