कविता - आत्मशोध
किनाऱ्यावर शांत बसून
लाटांची लयबद्ध ये-जा न्याहाळताना,
क्षणभर आश्वासक वाटणारी
ती सागराची गूढ गाज...
मनाला स्पर्श न करताच
क्षणात दूर निघून जाते.
ओंजळीत साठवलेली स्वप्ने
पाण्याच्या थेंबांसारखी
हळूच निसटतात,
कारण —
जीवनाचं खरं सौंदर्य
फक्त पाहण्यात नाही,
ते अनुभवन्यात असतं!
सागराचं अंतरंग
फक्त वीरांपुढेच उघडतं.
ज्यांचं मन स्थिर,
ज्यांच्या पावलांमध्ये सातत्याचं बळ आहे,
त्यांनाच लाभतो
मोत्यांचा खरा ठाव.
मोती सापडतात खोल पातळीवर,
जिथे उजेडही
अंधाराशी नम्र होतो,
आणि श्वासांची किंमत
मनाच्या निर्धारावर ठरते...
रिकामी ओंजळ हळूच सांगते —
“अजून पाण्यातील झेप अपुरी आहे!”
ती झेप केवळ प्रयत्नांची नसते,
तर स्वतःच्या मर्यादा पार करून
अात्मशोध घेण्याची असते!
पहिलं पाऊल —
अवघड, थरथरतं,
पण त्यातच दडलेलं असतं
परिवर्तनाचं मूळ बीज!
भीतीचे अंधार दाटले तरी,
संशयाच्या लाटा डचमळल्या तरी,
पाऊल टाकल्याशिवाय
नव्या दिशांना सुरुवात होत नाही.
सागरात उतरणं म्हणजे
स्वतःच्या मर्यादांना सामोरं जाणं,
अंधारातही
प्रकाशावर श्रद्धा ठेवणं.
कारण —
जीवनातील खरी रत्ने
कधीच किनाऱ्यावर सापडत नाहीत!
ती मिळतात
फक्त त्यांना —
ज्यांनी स्वतःला शोधलं,
अंतर्मनाशी सुसंवाद साधला,
आणि अंधाराशी मैत्री करत
स्वतःच्या स्पंदनांचा अर्थ लावला…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०५/२०२५ वेळ : १०:१७
Post a Comment