कविता - संचित
सप्तरंगी स्वप्नांच्या आकाशात,
कितीही उंच भरारी घेतली
गर्वाच्या मातीवर...
कितीही उभारले सोन्याचे महाल
कितीही रचल्या पैशांच्या राशी,
तरी अखेरच्या क्षणी
हात रिकामेच राहतात, रे मित्रा...
दारात उभी असते
एक काळसर सावली –
शांत, पण अटळ,
नजरेत त्याच्या
ना करूणा, ना राग –
फक्त निर्विकार समता...
तो हळूच म्हणतो –
"चल, वेळ झाली..."
आणि क्षणातच गमावले जातात
अधिकार, संपत्ती, मानमरातब...
शेवटचा श्वासही
न मागता निघून जातो!
पायात चप्पलही
घालू देत नाही,
मग या दागिन्यांची, मालमत्तेची,
थाटामाटाची काय कथा?
काहीच सोबत जात नाही...
फक्त मागे राहतो –
एक अपूर्ण शब्द,
एखादं अव्यक्त प्रेम...
आणि जीवनाचा सारीपाट...
म्हणून सांगतो, मित्रा –
जगणं मोजू नकोस वस्तूंमध्ये,
ते शोध माणसांमध्ये, क्षणांमध्ये...
हात दे कोणाला सावरण्यासाठी,
कान दे एखाद्याचं दुःख ऐकण्यासाठी,
हसव जरासं...
कोणाचं मरण थोडं हलकं करायला...
कारण शेवटी –
दारात उभा राहिलेला यम
तुला बोलावेल...
ना आवाजात संताप,
ना चेहऱ्यावर कोरडेपणा –
फक्त एक निर्विकार सत्य...
आणि तू जाशील –
एकटाच...
रिकाम्या हातांनी...
पण मागे राहील
एखाद्याच्या अंतर्मनात नकळत रुजलेलं
तुझं माणूसपण –
जे खरंच...
तुझं 'संचित' ठरेल.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०५/२०२५ वेळ : ०७:४७
Post a Comment