कविता - उर्मिला : अंतःसूर्य
ती होती...
नाटक संपल्यानंतर रंगमंचावर
शांतपणे उभ्या असलेल्या पावलांसारखी,
पायऱ्यांच्या कुशीतल्या अंधारात,
कोलाहलाच्या पार्श्वसंगीतात
मौनाने बोलणारी एक मुद्रा...
रामायणाच्या तेजस्वी पटलावर
ती ठळक नव्हती,
पण तरीही ती होती —
लक्ष्मणाच्या मौनात,
भरताच्या अपराधगंडात,
आणि सीतेच्या पावलांमागे उमटलेल्या श्वासात...
ती होती —
नजरेच्या टोकावर नाही,
पण काळजाच्या मध्यभागी...
एक सावली —
पडद्याच्या पलीकडे,
पण जिच्यामुळे प्रकाशाचं अस्तित्व सिद्ध होत होतं.
ती उभी होती —
एकटी,
आतल्या आर्ततेच्या दिव्यात न्हालेली,
रात्रंदिवस
निसर्गाशी, आठवणींशी, स्वतःशी संवाद साधणारी…
“मी नसतानाही
मी येथे आहे…”
असं तिचं अस्तित्व
पावलोपावली पुन्हा जन्म घेणं…
अश्रूंना शब्द न देता
तिनं मौनाचं गाणं उरात साठवलं...
तिच्या डोळ्यांतील ओल
एक वाळवंट हलकेच ओलावून गेली…
प्रकाशाच्या वर्तुळात,
ती फक्त सावली नव्हती,
ती तेज बनली होती —
अविचल, निःशब्द, पण बोलकी…
ती उर्मिला होती —
नायिका नव्हे,
पण कथा घडवणारी,
न दिसणारी… पण सतत जाणवणारी…
जिच्या अस्तित्वाची
एक हलकीशी जाणीव
आजही प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात
हळूच स्पंदते…
ती अजूनही आहे —
डोळ्यांतल्या समंजस शांततेत,
नि:शब्द लढ्यांच्या धैर्यात,
सावलीसारखी सामर्थ्यशाली,
आणि सूर्यासारखी तेजस्वी…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १४/०५/२०२५ वेळ : १६:४७
Post a Comment