कविता - "तू... ठीक आहेस ना?"
हे जग म्हणजे एक रंगमंच
आणि माणूस?
मुखवटे चढवलेला अभिनेता!
कोणी मेला की
आर्त रडारड होते,
डोळे पाणावतात,
आठवणी धुमसतात…
पण तो जिवंत असताना
त्यालाच मरणयातना दिल्या जातात.
श्वास थांबतो तेव्हा,
अश्रूंचा महापूर उसळतो.
पण त्याच्या इच्छा, दुःख, आवाज, हक्क...
जिवंतपणी सगळं दाबून टाकलं जातं!
"तो आता आपल्यात नाही..."
म्हणून सांत्वनाचा खेळ रंगतो.
पण तो जवळ असताना
कधी त्याचं अंतरंग जाणलं होतं का?
हसताना माणूस खोटं बोलतो,
रडताना मात्र खरेपण उमटते!
जिवंत वेदनांकडे दुर्लक्ष,
आणि मृताच्या आठवणींना सन्मान!
हेच का सत्य?
की माणसाचा हाच खरा चेहरा?
कधीतरी,
कोणी तरी,
कुणाच्या तरी जिवंत अस्तित्वाकडे पाहून
थांबेल का क्षणभर?
आणि विचारेल —
"तू... ठीक आहेस ना?"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १३/०५/२०२५ वेळ : ०६:३९
Post a Comment