लघुकथा - गंतव्य भाग-६
चावी तिच्या हातात देताना त्यांच्या थरथरत्या बोटांचा तो क्षणभराचा स्पर्श, नकळतच तिच्या अंतर्मनात खोलवर झिरपला. शब्दांची गरजच नव्हती — त्या नजरेत एक अपरिहार्य शांतता भरून राहिली होती, जणू एखादं मौनात गुंतलेलं, तरीही स्पष्ट जाणवतं सत्य त्या क्षणात उभं होतं.
त्यांनी दरवाज्याकडे सूचित केलेली हलकीशी हालचाल नंदितासाठी केवळ प्रवेशाचे संकेत नव्हती — ती जणू तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात होती.
तिच्या मनात अनाम भीतीची एक सावली डोकावत होती. तरीही, चावी कुलूपात टाकतानाचा कंप हळूहळू स्थिरावत गेला — जणू एक अदृश्य विश्वास तिला हात द्यायला पुढे सरसावत होता. कुलूप उघडतानाचा खटक्याचा आवाज, तिच्या अंतर्मनातील अनेक गूढ कवाडं उघडून टाकत होता.
दार उघडताच आलेली वाऱ्याची झुळूक केवळ तिच्या चेहऱ्यावरून नाही, तर थेट आत्म्याच्या खोल कपाऱ्यांतून वहात गेली. त्या झुळुकीत जुन्या दिवसांची धूळ होती, आठवणींचा मंद गंध होता — जणू काळाच्या दारात विसावलेला भूतकाळ तिला पुन्हा साद घालत होता.
घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच, क्षणभर काळ जणू स्तब्ध झाला. समोर पसरलेली जागा हळूहळू धूसर पडद्यासारखी उलगडू लागली. शब्द नव्हते, पण प्रत्येक कोपरा, भिंत, खिडकी काहीसं कुजबुजत होती — एक अदृश्य संवाद, तिच्या श्वासात मिसळून जात होता.
त्या जागेचा गंध — धुळीचा, लाकडाचा, जुन्या कागदांचा — पण त्यात होती एक जिव्हाळ्याची ओळख. जणू बालपणात हरवलेलं, विस्मृतीच्या गाभाऱ्यात लपलेलं कोणीतरी आज हळूच सामोरं येत होतं. प्रत्येक पावलागणिक, त्या घराचं अस्तित्व तिच्यासमोर उलगडत होतं — बोलक्या आठवणींमध्ये, जिवंत झालेल्या सर्जनात.
छताला झुलणारा पंखा, वेळेच्या ओझ्याने थांबलेला, तरी त्याच्या बंद गतीतही एक अनाहत नाद. कोनाड्यात विणलेली कोळ्यांची जाळी — जणू विस्कटलेल्या नात्यांना अजूनही आकार देत होती.
भिंतींवर लावलेले पिवळसर फोटो — चेहऱ्यांवर विसावलेली शांतता आणि डोळ्यांत दडलेली कुणा काळाची, कुणा प्रियजनांची न सांगितलेली कहाणी. त्या नजरांनी तिला थेट पाहिलं नाही, पण त्यांच्या मागचं मौन तिच्या हृदयाशी बोलून गेलं — जणू विचारत होतं, "आलीस का?"
एका कोपऱ्यात विसावलेली ती पेटी — मखमली झाकणाखाली दडलेले सूर, तिच्या स्पर्शाची वाट पाहत होते. ती बराच काळ वाजली नव्हती, पण तरीही त्यातून एक अपूर्ण राग अजूनही हवेत तान छेडत होता.
जुन्या चुलीभोवती साचलेला राखेचा थर, त्या उबेला कवटाळून बसलेला — प्रेमाचा, सवयींचा, एकत्रतेचा. त्या चुलीचा नुसता स्पर्श, तिच्या मनात पुनर्जन्माची ठिणगी टाकत होता. जणू जीवनातला एक अग्निकुंड पुन्हा चेतवत होता.
चालताना अचानक आरशात उमटलेलं प्रतिबिंब — तिचंच होतं, पण तरीही कोणाचं तरी जुनं, ओळखीचं. त्या धूसर काचेतून भूतकाळातला तिचा अंशच जणू तिला निरखून पाहत होता. त्या क्षणी, ती घराच्या आत्म्यात विरघळून गेली.
कोपऱ्यात झुलणारा जुना झोका, हळूवार हालत होता — जणू अनंतकाळाची प्रतीक्षा पूर्ण झाल्याचा श्वास टाकत, कुजबुजत होता... "आलीस... अखेर."
घरातील प्रत्येक भिंत, चौकट, ओटा, फडताळ — सगळं बोलत होतं. शब्दांशिवाय, पण स्पष्ट. कुणी प्रश्न विचारत होतं, कुणी आठवणींतून उत्तर देत होतं, तर कुणी फक्त हसून, ओळख पटवून देत होतं — "ओळखलंस का आम्हांला?"
नंदिता त्या घरात फक्त शिरली नव्हती — ती एका विस्मृतीत गेलेल्या आयुष्याच्या नव्या वळणावर पोहोचली होती. त्या क्षणी, तिच्या मनात भूत आणि वर्तमान यांचं गूढ मिश्रण घडत होतं.
ती वास्तू जणू तिचीच होती — तिच्या आयुष्यातील एक हरवलेलं पान. आणि आता, तीच वास्तू स्वतःहून तिला पुन्हा साद घालत होती. त्या सादेचे प्रतिध्वनी तिच्या अंतःकरणात गुंजू लागले.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०६/०४/२०२५ वेळ : ०४:३२
Post a Comment