लघुकथा - गंतव्य भाग-७
घरात येऊन बऱ्याच वेळानेही, नंदिता अजूनही त्या घराच्या आठवणींचे संदर्भ जोडू शकत नव्हती. भिंतींवरून नजर फिरवली, छताच्या जुनाट पट्ट्यांकडे पाहिलं, ओसाड कोपरे शोधले... पण काही जुळत नव्हतं.
तेवढ्यात, मागून एक मंदसा आवाज तिच्या कानावर आला — "नंदू..."
ती दचकून मागे वळली. मागे तेच वृद्ध गृहस्थ उभे होते.
"काय काका?" भानावर येत नंदिता म्हणाली.
ते अलगद हसले. "तू इथे थांब. तुझं सामान लॉजवरून घेऊन मी येतो. काही गरज वाटली तर हा माझा नंबर... ह्यावर फोन कर." ते म्हणाले आणि एक कागद तिच्या हातात दिला. "आणि हो... ही तुझी खोली. तू आराम कर." असं म्हणत त्यांनी एका खोलीकडे बोट केलं आणि, "निघतो मी. जाताना दार ओढून घेतो, तू आतून कडी लाव." असं म्हणून ते बाहेर गेले. दरवाज्याच्या बंद होण्याचा आवाज घरभर घुमला. तिने हळूच कडी लावली.
घरात शांतता पसरली — घनघोर, जणू काही वाट पाहणारी.
हळूहळू ती त्या खोलीकडे वळली...
तेवढ्यात, पुन्हा तोच स्वर — "नंदू..." ती थांबली. "बोला काका?" ती मागे वळून म्हणाली.
...पण मागे कोणीच नव्हतं. आवाज मात्र स्पष्ट होता. केवळ मनाचा भास नव्हता. पुन्हा तोच स्वर — लयीत गुंजणारा, पण तिच्या आठवणीत न बसणारा. थोडी घाबरत, ती पुन्हा खोलीकडे वळली. दाराला हात लावताच तिच्या मनगटावरून एक थंड झुळूक गेली — जणू कुणीतरी थंड बोटांनी स्पर्श केला असावा.
तिने हलकेच दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं. भिंतींवरील सावल्या अधिक गडद आणि लांबट होत गेल्या. जणू सूर्य नव्हे, तर 'काळ' स्वतः त्या भिंतींवर खेळ करत होता.
खोलीत एक हलकी धूसर झाक होती. पण त्या धुरकटतेपलिकडे एक आकृती अस्पष्ट दिसत होती — एक वृद्ध स्त्री, खिडकीजवळ पाठमोरी बसलेली. केस शुभ्र.
नंदिताचं काळीज थरथरलं. "आजी?" तिच्या ओठांवर शब्द आले, पण आवाज बाहेर आला नाही.
ती हळूहळू पुढे गेली... पण जसजशी ती जवळ गेली, तशी ती आकृती विरघळत गेली. आणि क्षणातच, खुर्ची रिकामी होती.
पण नंदिता आवाक होऊन पाहातच राहिली. तिचा श्वास खोलवर जात थांबला. कारण खुर्चीच्या एका बाजूने, जमिनीवर पसरलेला होता — तिच्या आजीचा ओळखीचा, जरीकाठाचा शालू.
"हे... खरंच घडतंय का?" ती स्वतःला विचारू लागली.
तेवढ्यात, भिंतीवरच्या आरशात तिचं प्रतिबिंब उमटलं —आरशातली "ती" हसत होती ... पण ते हास्य नंदिताचं नव्हतं. नंदिता एक पाऊल मागे सरकली आणि तिच्या पायाला कसलासा स्पर्श झाला. पाहाते तर काय - तिथे एक जुनी, लाकडी पेटी होती. बंद. तिच्यावर नाजूक नक्षीकाम. तिने ती उघडायचा प्रयत्न केला. पण इतक्यात, कानात पुन्हा तोच स्वर — "सावध..." तिचं अंग शहारून गेलं. ती मागे हटली. पण फार उशीर झाला होता. पेटीच्या झाकणावर हलकेसे निळसर प्रकाशाचे वलय उमटायला लागले. जणू ती केवळ पेटी नव्हती — ती एक गूढ दरवाजा होती. त्याच्या आड काहीतरी होतं — दडलेलं, विस्मृतीत गेलेलं, पण तिला ओळखणारं. तेवढ्यात, काहीतरी जाणवण्याआधीच... तिच्या पाठीवर कुणीतरी थंड हात ठेवल्यासारखं तिला वाटलं. आणि आवाज आला — थेट अंतर्यामी जाणारा. "हा खेळ अधूरा राहिलाय, नंदू... तू परत आली आहेस — तो पूर्ण करायला."
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०७/०४/२०२५ वेळ : ०२:४३
Post a Comment