लघुकथा - गंतव्य भाग-३
गाडी पुढे सरकत होती. नंदिताने खिडकीबाहेर पाहिलं. सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी आसमंत केशरी मखमलीने झाकला होता. धूसर भासणारी दृश्यं आता स्पष्ट होत होती, जणू तिच्या मनातील गोंधळही निवळू लागला होता.
तिने फोन उचलला आणि बाबांचा नंबर फिरवला. फोन उचलताच त्यांचा मऊसुत आवाज ऐकू आला.
"हॅलो... पिल्ला?"
नंदिताने हळूच विचारलं, "बाबा, तुम्ही उठलात का?"
"हो गं... पण तू कुठे आहेस? तू कशी आहेस?"
एक क्षण तिला वाटलं, की अचानक निघून जाण्याचं त्यांना वाईट वाटेल. पण त्यांच्या आवाजात नाराजी नव्हती. केवळ माया आणि काळजी होती.
ती काही क्षण गप्प राहिली. मग शांतपणे म्हणाली, "बाबा, मी काही दिवस मालवणला जातेय... स्वतःसाठी थोडा वेळ घ्यावा असं वाटलं."
त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. "ठीक आहे. फक्त काळजी घे... आणि काही गरज लागली तर कळव. आणि हो, संपर्कात रहा."
त्या एका वाक्याने तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ती स्वतःच्या शोधात होती, पण तिला उमगलं की तिच्या अस्तित्वाची मूळ वीण तिच्या कुटुंबातच आहे. तिच्या जबाबदाऱ्या केवळ ओझं नव्हत्या, तर त्या तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत्या.
"हो बाबा, मी काळजी घेईन आणि फोनही करत राहीन. तुम्हीपण काळजी घ्या आणि गोळ्या न विसरता वेळच्यावेळी घ्या. चला फोन ठेवते. टाटा."
"हो पिल्ला, टाटा."
फोन ठेवल्यावर तिने सुस्कारा टाकला. आता तिच्या प्रवासाचा हेतू स्पष्ट झाला होता—स्वतःला समजून घेणं, स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःला सक्षम बनवणं आणि जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणं.
ट्रेनचा वेग कमी झाला. ती खिडकीबाहेर पाहू लागली. स्थानक जवळ येत होतं. पाटीवर ठळक अक्षरांत लिहिलं होतं—"मालवण."
गाडी मालवण स्थानकात थांबली, आणि नंदिता हलक्या पावलांनी खाली उतरली. रस्त्याच्या दुतर्फा नारळ, पोफळीच्या उंच झाडांनी मोकळा श्वास घेतला होता. लाल मातीच्या घरांनी तिच्या मनात आजीच्या आठवणी जाग्या केल्या. आजी म्हणायची, "या मातीला एक खास सुगंध असतो, तो एकदा श्वासात भरला की विसरता येत नाही."
ती थेट एका छोट्याशा लॉजमध्ये पोहोचली. तिने आधीच ऑनलाइन बुकिंग केलं होतं. आत जाताना तिला वाटलं, हे फक्त राहण्यासाठी एक ठिकाण नव्हतं—तर तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होती.
थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ती समुद्रकिनारी पोहोचली. तिच्या डोळ्यांसमोर जणू स्वप्नांचं विश्व उभं राहिलं. निळ्याशार समुद्राची अनंतता, आकाशाच्या मिठीत सामावलेलं क्षितिज आणि रंगांची उधळण... हे दृश्य डोळ्यांनी पाहण्याचं नव्हतं, तर आत्म्याने अनुभवण्यासारखं होतं.
समुद्राचा खारा वारा केसांत मोकळेपणाने खेळत होता. वाळूच्या ओलसर स्पर्शाने तिचे पायही मोकळे होत होते. लाटा एकामागून एक किनाऱ्यावर आदळत होत्या, जणू त्या तिच्या मनातील विचारांना हलकं करण्यासाठी आल्या होत्या. डोळे मिटून तिने समुद्राच्या गाजेवर कान दिला. त्यात एक गूढ, पण आश्वासक सूर होता. समुद्र जणू तिला सांगत होता—"तू इथे तुझ्या शोधात आली आहेस, आणि इथेच तुला उत्तरं सापडतील."
त्या अथांग निळाईत तिला स्वतःच्या विचारांचं प्रतिबिंब उमटताना दिसलं. गोंधळलेल्या भावना लाटांसारख्या हलक्या होत होत्या. तिने अलगद वाळूत पाय रोवले. हळूहळू लाटा येऊन तिच्या पावलांभोवती मृदू स्पर्श करत होत्या.
"लाटा खरंच बोलतात का?" लहानपणी तिने आजीला विचारलेला प्रश्न आठवला.
"हो ग, पण त्यांचं ऐकायला शांत मन लागतं." आजी हसून म्हणायची.
आणि आज... तिला पहिल्यांदाच जाणवलं, त्या लाटांत एक गूढ पण समजूतदार सूर होता. त्या लयबद्ध गाजेमागे एक आवाज दडला होता—"तू हरवलेली नाहीस, फक्त थोडी विस्कटली आहेस. स्वतःला सापडू दे."
तिच्या डोळ्यांत हलकंसं पाणी आलं, पण मन शांत होतं.
तिला आता नक्की कळलं होतं—ती इथे का आली आहे. स्वतःच्या आठवणींना नवीन अर्थ देण्यासाठी... स्वतःचं गंतव्य स्पष्ट करण्यासाठी!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०३/०४/२०२५ वेळ : ०८:४६
Post a Comment