लघुकथा - गंतव्य भाग-४

लघुकथा - गंतव्य भाग-४

नंदिता समुद्रकिनाऱ्यावर एकटीच फिरत होती. संध्याकाळच्या गडद होत जाणाऱ्या प्रकाशात क्षितिजावर हलणाऱ्या होड्यांकडे तिचं लक्ष गेलं. ती या गावात आली, आजीसाठी, पण या जागेशी तिचा काहीच संबंध नाही... निदान तिला तरी तसं अजून वाटत नव्हतं.

तेव्हड्यात बाजूला वाळूत बसलेल्या एका व्यक्तीकडे तिचं लक्ष गेलं. ओळखीचे वाटणारे पण अनोळखीच. तेच वृद्ध गृहस्थ!

त्यांच्या जवळ जाऊन तिने आश्चर्यचकित होऊन तिने विचारलं, 
"काका, तुम्ही इथे?" 

वृद्ध गृहस्थ थोडा वेळ समुद्राकडे पाहत राहिले. मग शांतपणे म्हणाले, "सांजवेळी सगळं स्पष्ट दिसतं, नाही का?"

नंदिता त्यांच्या या वाक्यावर चक्रावली. "म्हणजे?"

ते हसले, पण त्यांच्या ह्या वाक्यामध्ये काहीतरी गूढ होतं. "प्रवासात आपण भेटलो होतो... पण आपली खरी ओळख आत्ता होणार आहे."

"मला समजलं नाही आहे तुम्हाला..."

"समजशील... थोड्या वेळाने." तिचं वाक्य पूर्ण होण्याअगोदरच ते म्हणाले.

त्यांनी हातात काहीतरी धरलं होतं—काही वाळूचे खडे-त्यांनी ते वाळूत टाकले.

"कधी कधी, कुणी तरी काही मागे टाकून जातं... आणि दुसऱ्याने ते उचलायची वाट पहातं."

"तुम्हाला नक्की काय म्हणायचंय काका?" नंदिता आता अस्वस्थ झाली होती.

उत्तर न देताच ते उठले आणि शांतपणे चालू गेले. नंदिता काही क्षण तिथेच स्तब्ध उभी राहिली. हे नेमकं काय होतं? प्रवासात भेटलेले हे गृहस्थ इथे कसे? आणि हे असं गूढ का बोलत आहेत?. याचा अर्थ काय असावा?

समुद्राच्या लाटांनी तिला भानावर आणलं, पण आता तिला काहीतरी अनोळखी ओढू लागलं होतं.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०४/०४/२०२५ वेळ : ०५:५०

Post a Comment

Previous Post Next Post