प्रस्तावना:
धरतीमाय — ही कविता मानवाच्या आणि मातीच्या नात्याचा एक जिव्हाळ्याचा प्रवास आहे. जन्मापासून अखेरपर्यंत माती आपल्याला स्पर्शते, पोसते, सावरते. या कवितेत धरतीमायची मायाळू ऊब, तिच्या वेदना, आणि तिच्या अमर्याद प्रेमाचे चित्रण तरल शब्दांत उमटले आहे. माणसाने केलेल्या स्वार्थी कृतींमुळे निसर्गाचे होणारे नुकसान दाखवतानाच, पुन्हा नव्याने जागृतीची आणि संवर्धनाची हाकही यातून दिली आहे. प्रत्येक वाचकाच्या हृदयात मातीबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम रुजवणारी ही कविता, एक नवा हिरवा आशावाद घेऊन येते.
कविता - धरतीमाय
ओंजळ उघडताच
मायाळू मातीचा गंध दरवळतो,
हातात भरते तिची ऊब,
हृदयात फुलतात जीवनगंधाची फुलं.
ती देते शुद्ध श्वास,
ती उधळते निसर्गाची अमृतधारा,
तीच उगमस्थळ सूर्याच्या सोनसाखळ्यांचं,
तीच रचते स्वप्न शीतल चंद्रकोरीचं.
आम्ही मात्र...
हिरव्या स्वप्नांना तोडून फेकतो,
नद्यांच्या ओठांवर बांधतो स्वार्थाच्या भिंती,
गडद धुक्यात हरवतो तिची निरागसता...
तरीही धरतीमाय रूसत नाही,
निमूटपणे झेलते अनंत वेदना,
काळजाच्या खोल जखमा लपवत,
पुन्हा प्रेमाने हात पुढे करते.
मग आपण तरी का थांबायचं?
चला, जागे होऊ या!
मातीच्या कुशित प्रेमाचं फुल अर्पू या,
हिरव्या स्वप्नांना नवे पंख लावूया!
पेरूया बीज प्रेमाचं,
फुलवू सावली नव्या पिढ्यांसाठी,
उंचावू आशेचे वटवृक्ष,
आणि धरतीमायेच्या कुशीत
नवजीवन रुजवूया.
कारण तिचं ऋण अपार आहे,
तीच आपली श्वासधारा आहे,
तीच आपली अखंड प्रेरणा आहे.
चला तर मग,
आज आणि आत्ता
धरतीमायेशी नव्याने मैत्री करूया —
हिरव्या भविष्याला कवेत घेऊन
पुन्हा एकदा पृथ्वीला
हिरव्या स्वप्नांनी बहरवूया!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २८/०४/२०२५ वेळ : १७:५०
Post a Comment