लघुकथा - अमृता


लघुकथा - अमृता

"मितालीच्या पोटात बाळ आहे, अशा वेळी मी तिला दुसऱ्या कुणाशी लग्न करायला कसं सांगू?"

"अरे, जरा नीट विचार कर. जे झालं ते नक्कीच वाईट होतं, पण आता पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे," अभिजीत मला समजावत होता. "माझी वहिनी मुलाच्या जन्मानंतरच गेली. पुतण्या अद्वैत आता दीड वर्षाचा आहे. आई त्याला सांभाळते, पण तीचंही आता वय झालं आहे आणि तिची तब्येतही वरचेवर ठीक नसते. आणि भाऊ दुसऱ्या लग्नाला तयार नाही. तो म्हणतो, ‘नवीन पत्नीने अद्वैतवर अन्याय केला तर मी सहन करू शकत नाही.’ मितालीसमोरही तशीच परिस्थिती आहे. पण तिनं आयुष्य असंच एकटं काढायचं का?"

"माझा भाऊ आणि मिताली—दोघंही संयोगाने त्यांच्या जोडीदारांविना अपूर्ण झाले आहेत. जर ते एकमेकांच्या आयुष्यात आले, तर दोघांचंही आयुष्य पूर्ण होईल. म्हणूनच मी तुझ्यापुढे हा विचार मांडतोय. एकमेकांच्या मुलांना आपलं मानून त्यांनी एक कुटुंब उभं केलं, तर त्यांच्या जगण्याला अर्थ मिळेल. जे झालं ते बदलता येणार नाही, पण भविष्यात आनंद मिळवणं त्यांच्या हातात आहे."

मी बराच विचार केला, आणि अभिजीतचा प्रस्ताव योग्य वाटू लागला. पण घरच्यांसमोर हे बोलायचं धाडस माझ्यात नव्हतं.

काका शांतपणे ऐकत होते. काकी आतापर्यंत पडद्याआडून ऐकत होत्या, पण आता अधीर होऊन पुढे आल्या. "बाळा, तुझ्या मित्राचा भाऊ कोण आहे? काय करतो? वय किती आहे त्याचं? तू भेटला आहेस का त्याला?"

मी त्यांना बसायला सांगत म्हणालो, "काकी, आधी निवांत बसा. मी सगळं सांगतो. ते खूप चांगले, सुसंस्कृत व्यक्ती आहेत. सरकारी शाळेत शिक्षक आहेत. वयाने माझ्याच वयाचे असतील. अभिजीत माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे, आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. तुम्ही त्यांना भेटून मग निर्णय घ्या. मला फक्त मितालीची चिंता वाटते. ती अजूनही खूप दुःखी आणि उदास असते."

काकी समजावत म्हणाल्या, "बाळा, काळजी करू नकोस. आपण तिला समजावू. लग्न झालं की तिला स्वतःलाही सुरक्षित वाटेल. तिच्या बाळावरही याचा चांगला परिणाम होईल. आत्ता ती एकटी, असहाय्य वाटत असेल. एक स्त्री म्हणून मी तिच्या भावना समजू शकते. तिला योग्य तो आधार मिळाला की जगणं सोपं वाटेल. आपण सगळे तिला आधार देऊ."

"ठीक आहे काकी, आपण मितालीचा विचार करू. तिच्या कोवळ्या वयात खूप मोठं संकट आलंय."

"हो रे, खरं आहे."

अखेर प्रसन्न आणि मितालीचा विवाह मोठ्या आनंदात पार पडला. त्याच्या प्रेमळ सहवासात आणि आमच्या आधारामुळे मिताली हळूहळू सावरली. काही महिन्यांनी तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला आणि संपूर्ण घर आनंदाने भारावून गेलं.

मुलीचं नाव काय ठेवायचं याची चर्चा सुरू झाली. मी म्हणालो, "प्रसन्न, तू मुलाचं नाव ‘अद्वैत’ खूप छान ठेवलं आहेस. आता मुलीचं नावही तूच ठरव."

प्रसन्न हसून म्हणाला, "माझ्या लेकीचं नाव ‘अमृता’ ठेवू. ती आमच्या आयुष्यात अमृतासारखी नवसंजीवनी घेऊन आली आहे."

त्याने मितालीकडे प्रेमाने पाहिलं आणि मितालीही त्यांच्याकडे आदराने पाहत मंद हसली— जणू सांगत होती, "तुझ्यासारखा सोबती मिळाल्याने मी धन्य झाले."

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : ०१/०४/२०२५ वेळ : १८:१४

Post a Comment

Previous Post Next Post