कविता - वेदना
वृक्ष कंप पावत
आभाळाकडे टक लावून पाहतो...
आणि कुऱ्हाड कोसळते
पानगळीच्या कथा सांगत...
फांद्या थरथरतात,
पाखरांची घरटी कोसळतात,
आणि वाऱ्याचा श्वासही क्षणभर थांबतो!
पण वेदना...
ती तर मुळांत साठलेली असते,
मूक, अदृश्य, अव्यक्त,
मातीच्या मिठीत दडलेली,
ओलसर काळोखात रुतलेली!
झाड उन्मळून पडते तेव्हा,
जखमा दिसतात खोडावर,
रक्त झिरपतं प्रत्येक घावामधून,
पण कोणालाच दिसत नाहीत
मुळांच्या वेदनांचे अश्रू...
ते असतात खोलवर,
मंद, संथ वाहणारे,
न बोलता सर्व सांगणारे,
ज्यांना केवळ भूमी समजते,
ज्यांची हाक फक्त वारा ऐकतो!
पुन्हा कुठेतरी अंकुर फुटतो,
एका नवीन जगण्याच्या आशेने,
पुन्हा एक नवा वृक्ष जन्मतो,
पण त्या वेदना...
नव्या अंकुराच्या कोंबातही थरथरतात,
वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत आठवणी जागवतात,
मातीच्या मिठीत हळूच साठतात,
आणि पावसाच्या थेंबांबरोबर झिरपत राहतात!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०४/२०२५ वेळ : ०२:५६
Post a Comment