सुमनला विजयसारखा सुस्थितीत असलेला पती मिळाला, तसेच चांगले सासरही लाभले. सर्व काही आनंददायी चालले होते. सासरचे कुटुंब एकत्र होते. प्रत्येकाशी सुमनचे चांगले संबंध होते. विजयचा भाऊ अमरला नोकरी मिळत नव्हती. तो सुशिक्षित होता, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता, पण त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते.
अमरच्या नोकरीविना असण्यावर सुमन नेहमी टवाळी करायची.
"काय अमर, आजही काहीव नाही का? सरकारी नोकरीच्या आशेवर बसून राहाल, तर काही मिळणार नाही! छोटंसं का होईना, पण काहीतरी काम सुरू करा!"
अमर सुरुवातीला हसत हे टोमणे उडवून लावत असे. पण जसजसे दिवस जात होते, तसतशी ती शब्दांची बोच अधिक तीव्र होत गेली. त्याच्या मनात एक सल निर्माण झाली. बेरोजगारीने आधीच अस्वस्थ असलेला अमर अधिकच तणावग्रस्त दिसू लागला.
विजयला हे जाणवत होते. एके दिवशी त्याने सुमनला शांत पण ठाम शब्दांत समजावले,
"सुमन, अमरच्या परिस्थितीची थट्टा करणे थांबव. त्याला आधीच मनस्ताप होतो आहे."
सुमनने हसण्याच्या सुरातच उत्तर दिले, "अहो, मी तर गंमत करत असते!"
"गंमत तुला वाटते, पण त्याला ती टोचते.शुमन, शब्दांनी होणाऱ्या वेदना जास्त खोल असतात." विजयने गंभीर स्वरात सांगितले.
सुमन थोडीशी गडबडली, "मला त्यांना दुखवायचं नव्हतं."
विजयने सुस्कारा टाकत तिच्याकडे पाहिले. "बेरोजगारी ही एक सल आहे, सुमन. जशी शरीराला लागलेली जखम लवकर भरून येत नाही, तशीच ही देखील... उलट, पुन्हा पुन्हा टोचली की ती अधिक खोल जात राहते."
त्या रात्री सुमन विचारात पडली. आपण नकळत अमरच्या जखमेवर मीठ चोळल्याचे तिलाही जाणवत होते.
दुसऱ्या दिवशी अमर जेवायला बसला असताना ती पहिल्यांदा अगदी सहज बोलली,
"अमर, नोकरी शोधताना काही मदतीची गरज असेल, तर नक्की सांग. विजय आणि मी तुझ्या पाठीशी आहोत."
अमर क्षणभर बघतच राहिला. पहिल्यांदाच सुमनच्या शब्दांत टवाळी नव्हती, आपुलकी होती. त्याने तिच्याकडे पाहिले आणि हलकेच हसला. त्या हास्यात अनेक न बोललेले शब्द होते... एक सल मोकळी झाली होती.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २३/०३/२०२५ वेळ : ०६:३९
Post a Comment