कविता - संस्कार – बंधन की वरदान?
संस्कार शिकवतात,
गप्प बसायला,
दुःख लपवायला,
हसऱ्या मुखवट्याआड वेदना दडवायला...
समाज सांगतो –
"सहन कर,
शांत रहा,
संस्कृती जप,
मर्यादा पाळ..."
पण विचारतं का कुणी
या बंधनात अडकलेल्या मनाला?
त्या न बोललेल्या वेदनांना?
या घायाळ श्वासांना?
माणूस शिकतो –
ह्रदय पिळवटून दुःख सहन करायला,
नात्यांच्या ओझ्यात स्वतःला हरवायला,
पिढ्यान् पिढ्या तोच वारसा पुढे न्यायला...
संस्कार, परंपरा, शिस्त –
खरंच वरदान आहेत का?
की न दिसणाऱ्या बेड्या,
ज्यात पिढ्यान् पिढ्या
हसत हसत अडकत जातात?
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/०३/२०२५ वेळ : ०७:१४
Post a Comment