लघुकथा - आयुष्याची मुदत
मोहनराव अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना घराची डागडुजी करण्याची गरज भासत होती, पण आवश्यक रक्कम हाताशी नव्हती. म्हणूनच त्यांनी आपल्या निवृत्तीवेतन खात्यावरून कर्ज घेण्याचा विचार केला. पत्नीच्या संमतीने ते एका राष्ट्रीयीकृत बँकेत कर्जासाठी अर्ज करायला गेले.
बँकेतील व्यवस्थापकाकडे त्यांच्या निवृत्तीवेतन खात्यावरून कर्ज घेण्याच्या शक्यतेबद्दल चौकशी केली.
"बँकेत अशा प्रकारच्या कर्जाची तरतूद आहे, पण..." असे व्यवस्थापक बोलता बोलता थांबला.
"पण काय?" मोहनराव यांनी विचारले.
व्यवस्थापक थोडा संकोचत म्हणाला, "वास्तविक, एका विशिष्ट वयानंतर असे कोणतेही कर्ज बँकेतून दिले जात नाही."
"असं का?" मोहनराव निराशेने म्हणाले.
व्यवस्थापक त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाला, "कारण... देव न करो, जर या दरम्यान तुम्हाला काही झाले तर..."
तो वाक्य पूर्ण करत असतानाच अचानक त्याला जोरदार उचकी लागली आणि तो आपल्या खुर्चीतच कोसळला. काही क्षणांतच त्याने शेवटचा श्वास घेतला.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २३/०३/२०२५ वेळ : ०५:०४
Post a Comment