कविता - गोल्डन बझर
जेव्हा वाट अंधुक होते,
स्वप्नांची वीण उसवू लागते,
तेव्हा तुझ्या शब्दांचा सोनसळी प्रकाश
माझ्या स्वप्नांना नवसंजीवनी देतो.
तू हसशील, पण खरंच,
तुझे बोल असतात जणू कोवळे सूर,
ज्यांच्या नाजूक स्पंदनांवर
माझं मन हलकेच नाचू लागतं.
तू माझ्या अस्तित्वाची ती तान,
जिच्या तालावर जगणं सजतं,
तुझ्या सहवासाच्या मंद लयीत
माझ्या भावना नव्याने उमलतात.
निराशेच्या गडद पडद्याआड
जेव्हा मी हरवून जातो,
तेव्हा तुझ्या अलवार स्पर्शातून
उजळून जातो आयुष्याचा रंगमंच.
माझ्या भावनांच्या मखमली पटावर,
तुझ्या स्वप्नांची नक्षी उमटवते,
अन् चैतन्याच्या तालावर,
अवघं आयुष्य झुलतं.
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण उत्सव वाटतो,
आणि निळ्या आकाशाच्या कुशीत
माझ्या अस्तित्वाला
नव्याने अर्थ मिळतो.
कारण....
तू माझ्या आयुष्याचा गोल्डन बझर,
जो एकदाच वाजतो,
पण त्या एका क्षणात
संपूर्ण आयुष्य उजळून जातं...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०३/२०२५ वेळ : ०६:०३
Post a Comment